मानवी विकास निर्देशांक वाढविणार

By Admin | Updated: January 27, 2015 23:34 IST2015-01-27T23:34:27+5:302015-01-27T23:34:27+5:30

जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे,

The human development index will increase | मानवी विकास निर्देशांक वाढविणार

मानवी विकास निर्देशांक वाढविणार

पालकमंत्री बडोले : प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जिल्हावासीयांना केले आश्वस्त
गोंदिया : जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६५ वा वर्धापन दिन कार्यक्रम कारंजा पोलीस कवायत मैदानात मोठ्या उत्साहात झाला. यावेळी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यात येतील. सालेकसा तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या हाजराफॉल येथे साहसी पर्यटनासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत असलेल्या कचारगडच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामधून सिमेंट पाथवे आणि पायऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गॅस ग्राहकांचे आधारकार्डशी संलग्न करण्याच्या प्रक्रियेत गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री बडोले यांनी केले.
यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आकर्षक कवायती, लेझिम आणि जनजागृतीपर नृत्यनाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, पत्रकार, विविध शाळांचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
काम वाटपासाठी ‘गोंदिया मॉडेल’
जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील रोजगार व व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थान्ाां जिल्हा कामवाटप समितीतर्फे सेतू केंद्राची कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेतू केंद्राबाबतच्या या धोरणाला राज्य शासनाने मान्यता दिली असून ‘गोंदिया मॉडेल’ या नावाने ही कार्यपध्दती राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बांबू कारागिरांना येणार ‘अच्छे दिन’
बांबू कारागिरांना चांगल्या प्रकारे या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अहमदाबाद येथील तांत्रिक मार्गदर्शकांच्या देखरेखीत महत्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यात येत आहे. बांबू उत्पादनापासून ते त्यापासून नवनवीन उत्पादने तयार करून राष्ट्रीय स्तरावर मार्केटींगची व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे या उद्योगाला नवीन चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री बडोले यांनी केला.

Web Title: The human development index will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.