गोंदिया : कानातील घाण काढण्यासाठी बड वापरणे, ही सवय आजही अनेकांमध्ये पाहायला मिळते. मात्र, ही सवय आरोग्यास घातक ठरू शकते. अयोग्य पद्धतीने साफसफाई केल्यास ऐकण्यावर, संतुलनावर आणि आरोग्यावरही परिणाम होतो.
कानातील केस, चिकट द्रव हेच मोठे रक्षककानात तयार होणारा मळ ही घाण नसून एक नैसर्गिक संरक्षण आहे. हा मळ धूळ, कीटक, बॅक्टेरिया यापासून कानाचे रक्षण करतो. त्याचप्रमाणे कानातील बारीक केसही बाह्य अडथळ्यांपासून कानाचे संरक्षण करतात.
कानात बड नकोचबाजारात सहज उपलब्ध असलेल्या बड किंवा काड्यांचा वापर केल्याने कानातील द्रव खोल ढकलला जातो, कधी कधी कानाच्या पडद्यालाही इजा होते. त्यामुळे कानाची स्वच्छता करताना यंत्रसामग्री किंवा रसायनांचा अनाहूत वापर टाळणे आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी अधिक दक्षता आवश्यकलहान मुलांच्या बाबतीत कानाची रचना नाजूक असल्याने कोणतेही ड्रॉप्स, तेल किंवा बड वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यांच्या कानात संसर्ग किंवा इजा झाल्यास ऐकण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.
कान स्वच्छ कसे कराल?आंघोळीनंतर बाहेरील भाग मऊ कपड्याने हलक्या हाताने पुसावा. कानात कोणताही ड्रॉप्स किंवा तेल टाकण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वारंवार खाज येणे, वेदना होणे किंवा ऐकण्यात अडथळा येणे, ही गंभीर लक्षणे असू शकतात, अशा वेळी तज्ज्ञांकडे तपासणी करावी.
"कानात बड, काड्या घालणे किंवा तेल वापरणे धोकादायक ठरू शकते. यामुळे कानात सूज, संसर्ग किंवा ऐकण्यात अडथळा निर्माण होतो. कानाची स्वच्छता ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीनेच करावी. अन्यथा कानाला इजा होऊ शकते."- डॉ. संजय भगत, कान-नाक-घसा तज्ज्ञ, गोंदिया