गोंदियात भीषण अपघात, दोन दुचाकींची समाेरासमोर धडक; एक ठार, दोन जण गंभीर
By अंकुश गुंडावार | Updated: February 25, 2026 19:57 IST2026-02-25T19:56:12+5:302026-02-25T19:57:10+5:30
Gondia : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) दुपारी अर्जुनी मोरगाव ते बोदरा मार्गावर घडली.

Horrific accident in Gondia, two bikes collide in front of Samora; One dead, two seriously injured
अर्जुनी मोरगाव : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) दुपारी अर्जुनी मोरगाव ते बोदरा मार्गावर घडली. मंगेश लुंगाराम शिवणकर (वय ३६, रा. ढिवरखेडा (पालांदूर चौरस) ता. लाखनी, जिल्हा भंडारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिगंबर जयदेव मडावी (वय ३५), गजानन मारुती मेश्राम (वय ३३, रा. माहूरकुडा) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
तालुक्यातील बोदरा देऊळगाव येथे बुधवारी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. पटशौकिनांची अर्जुनी मोरगाव ते बोदरा मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. तालुक्यातील माहुरकुडा येथील दिगंबर मडावी व गजानन मेश्राम हे दोघेही आपल्या नवीन दुचाकीने बोधराकडून गावाकडे जात होते. तर, लाखनी तालुक्यातील ढिवरखेडा येथील रहिवासी मंगेश शिवणकर हा अर्जुनी मोरगाववरून बोदरा येथे दुचाकीने जात होता. येथून चार किमी अंतरावरील जंगल शिवारात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकींवरील तिघे जण रस्त्यावर कोसळून रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. या घटनेची माहिती माहूरकुडा रहिवासी किशोर तागडे यांनी पोलीस स्टेशन व १०८ क्रमांकावर माहिती देऊन रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलविले. यानंतर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगेश शिवणकर याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तर दोन जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.