जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:04+5:30

इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

Heavy rainfall in three talukas of the district | जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी

जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी

ठळक मुद्देपुजारीटोला, कालीसराड धरणाचे दरवाजे उघडले : सहा मार्ग बंद, नदी नाले तुडूंब, नदीकाठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात शनिवारी (दि.७)रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आमगाव,सालेकसा आणि गोंदिया तालुक्यात जोरदार हजेरी लावली.या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले. इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
मागील दोन तीन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते.गेल्या चौवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद ही आमगाव तालुक्यात १२२ मि.मी.झाली असून त्या पाठोपाठ सालेकसा ९२.८६, गोंदिया ७८.५७ मि.मी.पाऊस झाला.तर रावणवाडी १०५, खमारी ८९, कामठा १३६, आमगाव १५०, तिगाव ७६.६०, ठाणा १२३, कट्टीपार १४२, सालेकसा १०८, कावराबांध ९८, साकरीटोला महसूल मंडळात ७२.४० मि.मी.पावसाची नोंद झाली. गोंदिया, आमगाव,सालेकसा या तीन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.मुसळधार पावसामुळे आमगाव शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे किडंगीपार-शिवणी,किंडगीपार-जवरी,बोथली-ठाणा, भजेपार-अंजोरा, चिचटोला-धानोली, घाटटेमणी-कामठा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पावसामुळे या तिन्ही तालुक्यात घरांची सुध्दा पडझड झाली असून महसूल विभागाने सर्वेक्षणास सुरूवात केली आहे.रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ओव्हर फ्लो झाले असून या धरणातून १ फूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.लगतच्या मध्यप्रदेशात सुध्दा मुसळधार पाऊस सुरू असल्याने संजय सरोवर धरणाचे ६ दरवाजे ६ फुटाने उघडण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. पावसामुळे रोवणी केलेल्या धान पिकाला संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसाने गाठली सरासरी
यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली होती.मात्र आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पावसाची तूट भरुन निघाली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो.त्या तुलनेत आत्तापर्यंत १३५० मि.मी.पावसाची नोंद झाली असून पावसाने सरासरी गाठली आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ९२ टक्के पावसाची नोंद झाली असून पाणी टंचाईचे संकट सुध्दा टळले आहे.
सिंचन प्रकल्प ७० टक्क्यांवर
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे.मागील सहा वर्षांत यंदा प्रथमच इटियाडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पात ७० टक्केच्यावर पाणीसाठा आहे.
वस्त्यांमध्ये साचले पाणी
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळपर्यंत कायम होता.त्यामुळे गोंदिया आणि आमगाव शहरातील काही वस्त्यांमध्ये पाणी साचले होते.त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. पावसामुळे काही प्रमाणात घरांची सुध्दा पडझड झाली आहे.
पावसामुळे सहा मार्ग बंद
पावसामुळे किडंगीपार-शिवणी, किंडगीपार-जवरी, बोथली-ठाणा,भजेपार-अंजोरा,चिचटोला-धानोली, घाटटेमणी-कामठा या मार्गावरील पुलावर पाणी वाहत असल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.
केशोरी,महागाव येथे सर्वाधिक पावसाची नोंद
जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि महागाव या दोन महसूल मंडळात झाली आहे.

Web Title: Heavy rainfall in three talukas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.