दमदार पावसाने शेतकरी सुखावला
By Admin | Updated: August 28, 2016 01:02 IST2016-08-28T01:02:13+5:302016-08-28T01:02:13+5:30
मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे

दमदार पावसाने शेतकरी सुखावला
पिकांना मिळाले जीवदान : १३४.८ मीमी. पावसाची नोंद
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारून शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून सोडले होते. मात्र परतून आलेल्या या पावसाने सर्वांनाचा खुश करून टाकले. असे असतानाही जिल्ह्याची तहान अद्याप भागलेली नाही.
यंदाचा पावसाळा नेहमीप्रमाणे हुलकावणी देणाराच ठरला. आता पावसाळा संपण्याची वेळ आली असतानाही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. परिणामी नदी,नाले व तलाव अद्याप कोरडे ठणठणाट दिसून येत आहेत. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर पडत असतानाच शेतीसाठी मात्र शाप ठरत आहे. पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने निर्माण झालेल्या उष्ण दमट वातावरणामुळे एकतर आजार फोफावले. त्यासोबतच पिकांवर रोगराई सुद्धा बळावली.
रबीच्या हंगाम हातून गेल्याने शेतकरी खरिपापासून आस बांधून होता. मात्र पावसाच्या खेळीने त्यांच्या या स्वप्नावरही गाज पडली. पावसाच्या खेळीने शेतकरी हताश होऊन बसला होता. मात्र मागील दोन दिवसांच्या पावसाने शेतकरी पुन्हा आशा बाळगू लागला आहे. या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली असून जिल्हा ओलाचिंब झाला आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारच्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्यात झोपडले असतानाच अन्यत्र तुरळक हजेरी लावली दिसल्याचे कळले. मात्र मागील दोन दिवसांपासून परतून आलेल्या वरूणराजाच्या दमदार एंट्रीने सर्वांनाच खुश करून टाकले आहे.
एकीकडे उकळत्या वातावरणापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे या पावसामुळे पिकांनाही जीवदान मिळाले. पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला असून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. (शहर प्रतिनिधी)
आणखी पावसाची गरज
जिल्ह्यात आतापर्यंत ६६६८.२ मीमी. पाऊस बरसला असून त्याची सरासरी ८३३.५ एवढी आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात १३४.८ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधीक ८१.० मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मात्र आजही जिल्ह्यातील नदी,नाले व तलाव कोरडेच आहेत. पावसाळा आता संपण्याची वेळ आली असतानाही ही स्थिती असल्याने उर्वरीत काळात काय होणार असा सवाल भेडसावत आहे. करिता जिल्ह्याला आणखी पावसाची गरज आहे.