आरोग्यसेवा ‘आॅक्सिजन’ वर

By Admin | Updated: January 24, 2015 01:15 IST2015-01-24T01:15:52+5:302015-01-24T01:15:52+5:30

आरोग्य सेवा महत्वाची व आपातकालीन सेवा आहे. राज्यातील नागरिकांना योग्य व तातडीची वैद्यकीय मदत व सेवा पुरविणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्य आहे.

On healthcare 'Oxygen' | आरोग्यसेवा ‘आॅक्सिजन’ वर

आरोग्यसेवा ‘आॅक्सिजन’ वर

यशवंत मानकर आमगाव
आरोग्य सेवा महत्वाची व आपातकालीन सेवा आहे. राज्यातील नागरिकांना योग्य व तातडीची वैद्यकीय मदत व सेवा पुरविणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्य आहे. परंतु जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातून या सेवा देणारी रुग्णालये आजारी आहेत. मूलभूत सुविधा, योग्य मनुष्यबळ नसल्याने आदिवासी दुर्गम भागातील महिलांना प्रसुतीसाठी १०० किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून योग्य व तातडीची आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या. परंतु या योजनांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने होत नसल्याने रुग्णांना मिळणारी तातडीची सेवा खंडीत झाली आहे. परिणामी रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आरोग्य सेवेतील मनुष्यबळ व या भागातील भौगोलिक परिस्थीतीचा अभ्यास करून आरोग्य सेवेचा ‘मास्टर प्लान’ तयार करणे अपेक्षित होते. परंतु कागदावरच घोडे सरकवून उपाययोजना आखल्याने या सेवा रुग्णापर्यंत पोहचत नाही. आमगाव देवरी व सालेकसा या तालुक्यातील नागरिकांना तातडीची सेवा देण्यासाठी प्रशासनाकडे संसाधने नाहीत. उपलब्ध मनुष्यबळ नाही. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर शासकीय उपचार सेवेकरिता जिल्हा रुग्णालयाची वाट धरावी लागते.
गंभीर आजाराकरिता जिल्हा रुग्णालयाची वाट
सदर तालुक्यात मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातील रुग्णांना गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ व तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना सरळ जिल्हा रुग्णालयाची वाट धरावी लागते. पर्यायी सोय नसल्याने रुग्णांना जीवन मरणाचा प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातुन जिल्हा रुग्णालयापर्यंत सलग १०० किलोमीटरचा प्रवास करून पोहचावे लागते.
ग्रामीण भागात रक्तपेढी नाही
जिल्हा रुग्णालयातील सेवेचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. अतिदुर्गम भागातील रुग्णांना रक्त संक्रमण उपचाराकरीता रक्तपेढी उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. शासनाने आमगाव रुग्णालयात रक्तपेढी संकलन गृह मंजूर केले. परंतु अद्यापही या ठिकाणी रक्त संकलन व साठवण प्रक्रिया सुरु झालेली नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना रक्तासाठी जिल्हा मुख्यालयावरच अवलंबून रहावे लागते.
अधिपरिचारिका करतात औषधी वितरण
विभागात औषध निर्मित्यांचे पदे रिक्त असल्याने रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहलेले औषधी निर्मित्याअभावी अधिपरिचारीका पुरवठा करतात. त्यामुळे रुग्णांना योग्य औषध त्यांना मिळणार याची शास्वती मात्र कुणीच देत नाही. त्यामुळे रुग्णांना धोका पत्कारुन औषधोपचार घ्यावा लागतो.
आमगावात हवी खास आरोग्य सेवा
येथील लोकसंख्या दीड लाखापर्यंत पोहचली आहे. तालुक्याचा भौगोलीक परिसर जवळपास २४ किमी अंतरावर पसरलेला आहे. अतिदुर्गम भागातुन नागरिकांना तातडीची सेवा देण्यासाठी प्रशासनाला मनुष्यबळ मिळाले नाही. तालुक्यात ग्रामीण रुग्णालय तर २२ आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची व्यवस्था तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० खाटांची व्यवस्था आहे. या पर्यायी व्यवस्थांमध्ये दररोज ८०० रुग्ण प्राथमिक उपचाराकरीता या रुग्णालयांमध्ये औषधोपचार करतात. तर वर्षात २५ महिलांची प्रसुती रुग्णालयांच्या माध्यमाने पुर्ण करण्याचे प्रयत्न केले जातात. तालुक्यात रुग्णसेवा देण्यासाठी इमारतीचे जाळे आहे. परंतु लागणाऱ्या सुविधा नाहीत. त्यामुळे प्राथमिक उपचारापलिकडे या रुग्णालयांना वाटचालच करता आलेली नाही. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात स्थापनेच्या प्रारंभी पासूनच वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयातील अधिकार प्राभारींवर येऊन ठेपला आहे. रुग्णालयात प्रयोगशाळांचे हाल, उपचार देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. तालुक्यात आरोग्य विभागांतर्गत ११ पदे रिक्त आहेत. जिल्हा पातळीसह शासनाकडे रिक्त पदे भरण्यासाठी मागणी करूनही पदभरती झाली नाही. तालुक्यात अतिताडीची सेवा देण्यासाठी सामान्य शल्यक्रिया सामान्य वैद्यक, प्रसुतीशास्त्र, बालरोग, अस्थिरोग, किरणोपायोजनशास्त्र, मुलशास्त्र, रोगनिदान शास्त्र, मानसोपचार, त्वचा व गुप्तरोग, नेत्ररोग, नाक, कान, घसा, दंत आरोग्य तज्ञांची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाची हतबलता नेहमीच पुढे आली. त्यामुळे रुग्णांना सामान्य उपचारापलिकडे या रुग्णालयांतुन आरोग्य सेवा मिळाली नाही.

Web Title: On healthcare 'Oxygen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.