रविराजाच्या वक्रदृष्टीने होरपळतोय जिल्हा
By Admin | Updated: May 15, 2016 01:21 IST2016-05-15T01:21:01+5:302016-05-15T01:21:01+5:30
यावर्षीच्या तापमानातील उच्चांक गाठत आज तापमान ४४.८ अंश सेल्सिअस पोहोचले. त्यामुळे तीव्र उन्हात शनिवारी सारेच होरपळून निघाले.

रविराजाच्या वक्रदृष्टीने होरपळतोय जिल्हा
तापमान ४४.८ : आणखीही चढण्याची शक्यता
गोंदिया : यावर्षीच्या तापमानातील उच्चांक गाठत आज तापमान ४४.८ अंश सेल्सिअस पोहोचले. त्यामुळे तीव्र उन्हात शनिवारी सारेच होरपळून निघाले. वाढत्या उन्हामुळे जीव आता कासावीस होऊ लागला असून कधी उन्हाळ््यापासून सुटका होते याची वाट सर्वच बघू लागले आहेत. मात्र मे महिना आता जेमतेम अर्ध्यातच आला असून उरलेल्या या १५ दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाशी छेड करून आपली नवी दुनिया वसविण्याचा घाट सुरू केला आहे. याचा ऋतुचक्र व निसर्गावर परिणाम पडत आहे. झाडांची कत्तल व सिमेंट कॉंक्रीटचे जंगल आज निगर्साला मारक ठरत असून याचेच परिणाम आहे की, पावसाळ्यात पाऊस पडत नसून उन्हाळ्यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे.
पूर्वी कधीही ४५ डिग्रीपर्यंत न जाणारे तापमान आता ४५ डिग्रीच्या जवळ पोहोचले असून तापमानाची ही पातळी वाढतच जाणार आहे. यंदाही असाच काहीसा प्रकार जाणवू लागला आहे. यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
यामुळे या दोन महिन्यात तापमान उतरले होते व उन्हाळा तेवढा काही भासला नाही. मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सुर्यदेवाने जिल्हावासीयांना चटका देण्यास सुरूवात केली. (शहर प्रतिनिधी)
१ व १३ मे सर्वाधिक उष्ण
मे महिन्याच्या सुरूवातीलाच सूर्याने आग ओकून आपली ताकद दाखवून दिली आहे. १ मे रोजी ४३ डिग्री तापमानाची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली. दि.१४ ला तापमान ४४.८ डिग्रीवर पोहोचले. तापमानाची ही पातळी पुढील १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात अशीच राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात ६ तारखेला सर्वात कमी ३५.३ डिग्री तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.
उष्माघाताचा बळी नाही
उष्माघाताचे प्रकार लक्षात घेता आरोग्य विभागाने येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष उष्माघात कक्ष तयार ठेवले होते. या कक्षात उष्मा लागणचे सुमारे ३५ रूग्ण भर्ती करण्यात आले होते. या रूग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली. मात्र उष्माघाताने यावर्षी एकही दगावला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवी धकाते यांनी दिली.