सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा फैसला आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:51 PM2018-12-11T23:51:48+5:302018-12-11T23:52:09+5:30

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.

Government lakes beautification decision today | सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा फैसला आज

सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा फैसला आज

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज : २५ विषयांवर होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.
१८ जुलैची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आता बुधवारी (दि.१२) सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेत काही महत्वाचे विषय असल्याने सर्वांच्या नजरा सभेकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे, सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय सध्या चर्चेत आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वेने सहमती दर्शविली असताना नगर परिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. अशात आता या सभेत सरकारी तलावाच्या विषयावर काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले. याशिवाय, शहरातील सुभाष उद्यानात नागरिकांची गर्दी वाढत असून तेथे क्रीडा सहित्य लावण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे बागेत क्रीडा साहित्य लावण्याबाबतचा विषय सभेत मांडला जाणार आहे. पिंडकेपार येथील बाग तयार झाली असून त्या बागेला राष्ट्रसंत तुकाराम महाराज उद्यान हे नाव देण्यात यावे याबाबतचा विषय मांडला जाणार आहे.
शहरातील सुर्याटोला, कुंभारेनगर, परमात्मा एक नगर अंतर्गत ग्रीनबेल्टमध्ये आरक्षीत जागेला यलो बेल्टमध्ये परिवर्तीत करणे, नगर परिषदेच्या जागांवर सुरक्षाभिंत बांधकाम व डीएलआर करणे, म्हाडासाठी आरक्षीत जागेचे आरक्षण यथास्थितीत ठेवणे, पोलीस क्वार्टरसाठी आरक्षीत जागेचे आरक्षण वगळून निवासी क्षेत्रात समाविष्ट करणे, स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत आवश्यक कामे करणे, नागरी वन व्यवस्थापन समितीची स्थापना, जीर्ण पंप हाऊस तोडून नव्याने बांधकाम करणे, शहर उपजिवीका केंद्राची स्थापना यासह अन्य विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

नगर परिषद शाळांचा होणार कायापालट
सभेत नगर परिषदेच्या शाळांमध्ये सौर वीज प्रकल्प लावणे तसेच शाळांच्या मैदानात सौर पथदिवे लावण्याबाबतचा विषय वीज विभागाडून मांडण्यात आला आहे. याशिवाय, शाळांची रंगरंगोटी करण्याचा विषय ठेवण्यात येणार असल्याने या विषयांना मंजुरी मिळताच नगर परिषद शाळांतील सुविधांमध्ये वाढ होणार आहे.
होर्डिंग्स व बॅनरचा पसारा हटणार
शहरात बघावे तेथे होर्डींग व बॅनर लावले जात असून यामुळे शहर सौंदर्यीकरण व नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील होर्डिग्स व बॅनरचा पसारा नियंत्रणात यावा यासाठी विशेष ठिकाण निश्चीत करणे याबाबतचा विषय सभेत मांडला जाणार आहे.

Web Title: Government lakes beautification decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.