लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल २६ लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत असल्याचा प्रकार शासनाने केलेल्या पडताळणीत उघडकीस आला. तर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा तब्बल ३२ हजार ८७३ कुटुंबात दोनपेक्षा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. तर २१ ते ६५ वयोगटातील ३४६८ लाडक्या बहिणी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या सर्वांची आता पडताळणी केली जात असून त्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; पण यादरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा लाडक्या बहिणींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २८ हजार लाडक्या बहिणी योजनेस अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर यात अनेक अपात्र लाभार्थी तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले. जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ५०७लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबांना भेट देऊन पडताळणी केली जात आहे. जवळपास ५० टक्के पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यात जिल्ह्यातील ३२ हजार ८७३ कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभघेत असल्याचे पुढे आले आहे. तर २१ ते ६५ वयोगटातील ३४६८ लाभार्थी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांची सुद्धा आता पडताळणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६० हजारांवर लाडक्या बहिणी या योजनेस अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींचा आकडा वाढणार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस जिल्ह्यातील ३ लाख ३७हजार ५०७ लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या.
- यापूर्वी केलेल्या पडताळणीत २ जिल्ह्यातील २८ हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या.
- त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत ३२ हजार ८७३ कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
५० टक्के पडताळणी शिल्लकजिल्ह्यातील एकूण ३ लाख ३७हजार लाभाथ्यर्थ्यांपैकी आतापर्यंत ५० टक्के लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र ठरले आहेत. तर आणखी ५० टक्के पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तर सोडावा लागणार लाभएका कुटुंबातील दोन लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो; पण ३२ हजार ८७३ कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले आहे.त्यामुळे आता त्या कुटुंबातील दोन लाभार्थी सोडून इतरांना स्वतःहून या योजनेचा लाभ घेणे सोडावे लागणार आहे.