घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात
By अंकुश गुंडावार | Updated: November 19, 2025 20:37 IST2025-11-19T20:36:15+5:302025-11-19T20:37:14+5:30
सात घरफोड्यांचा उलगडा : ४.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; मध्यप्रदेशातही आरोपी वाँटेड

Gondia police nab interstate gang involved in housebreaking
गोंदिया : आंतरराज्यीय घरफोड्या टोळीवर अखेर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने १९ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशातून कार्यरत असलेल्या या टोळीने गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
देवरी येथील सुरभी चौक रहिवासी फिर्यादी योगेश मुनेश्वर यांच्यासह परिसरातील अनेकांकडील सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, लॅपटॉप व रोख रक्कम, असा एकूण १.०१ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार २६ ऑक्टोबर रोजी देवरी पोलिस ठाण्याला केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून मध्यप्रदेशातील बालाघाट व सिवनी जिल्ह्यांत धाड टाकली. यात मकबुल शाह (३५, रा. चांगोटोला, ता. लामटा, जि. बालाघाट, मध्यप्रदेश), मुस्तफा ऊर्फ गुड्डू शाह (४७, रा. मालनवाडा, ता. केवलारी, जि. सिवनी, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात घरफोड्या केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पाेलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शन करण्यात आली. पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार रियाज शेख, पोलिस हवालदार तुलसीदास लुटे यांनी केली. तपासादरम्यान आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, चांदीची भांडी, असा एकूण ४ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस ठाणे देवरीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एका पाठोपाठ सात घरफोड्यांची कबुली
आरोपींनी गोंदिया जिल्ह्यात सिंदीपार (सडक अर्जुनी), महाराजीटोला (सालेकसा), कोरणी, कोहमारा (सडक अर्जुनी), साखरीटोला (मेडिकल दुकान फोडून चोरी), साखरीटोला (२४ ऑक्टोबर-घरफोडी), देवरी-२५ ऑक्टोबरच्या रात्री ३ ते ४ घरांमध्ये घरफोडी अशा ठिकाणी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप व इतर साहित्य चोरी केल्याचे उघड केले. देवरी, सालेकसा, डुग्गीपार व रावणवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद आहेत. यातील आरोपी महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील मंडला परिसरातही घरफोड्यांत सक्रिय असून, अनेक पोलिस ठाण्यामध्ये आरोपी ‘वाँटेड’ आहेत.