गोंदियातील घटना ! मार्निंग वॉक करतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत युवती ठार
By अंकुश गुंडावार | Updated: December 6, 2025 17:10 IST2025-12-06T17:09:32+5:302025-12-06T17:10:15+5:30
नोनीटोला सोनी येथील घटना : गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Gondia incident! A young woman was hit by an unknown vehicle while taking a morning walk and died.
गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील सोनी नोटीटोला मार्गावर मार्निंग वॉक करीत असलेल्या १७ वर्षीय युवतीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.६) पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास नोनीटोला तलावाजवळ घडली. मुस्कान भुपेंद्र साखरे (वय १७) रा.नोनीटोला, ता. गोरेगाव असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील नोनीटोला येथील मुस्कान साखरे ही युवती दररोज मार्निंग वॉकसाठी सोनी-नोनीटोला मार्गावर जात होती. शनिवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे या मार्गावर मार्निंग वॉक करीत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने तिला नोनीटोला तलावाजवळ जोरदार धडक दिली. या धडकेत मुस्कानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान मार्निंग वॉक करीत असलेल्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच गोरेगाव पाेलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सोनी येथे घेत होती शिक्षण
मुस्कान ही गोरेगाव येथील मनीभाई ईश्वर पटेल विद्यालय येथे इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. मुस्कानला एक बहीण असून ती सुध्दा शिक्षण घेत आहे. मुस्कानचे वडील भुपेंद्र साखरे यांचे निधन झाले असून तिची आई साेनी येथील कान्व्हेंटमध्ये चपराशी म्हणून काम करते. त्याच दोन्ही मुलींचे शिक्षण व कुटुंब सांभाळतात. मुस्कानच्या मृत्यूने साखरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रस्त्यांवर मार्निंग वॉक करताना घ्या काळजी
हिवाळ्याचे दिवस असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिक हे मार्निंग वॉक करण्यासाठी मुख्य मार्गावर जातात. मात्र मार्निंग वॉक करीत असलेल्या व्यक्तीला वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मार्निंग वॉक करीत असताना नागरिकांनी काळजी घ्यावी.