गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी, रब्बी पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 18:05 IST2021-05-08T18:03:44+5:302021-05-08T18:05:23+5:30
Unseasonal rains in Gondia district : हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे.

गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी, रब्बी पिकांचे नुकसान
गोंदिया : मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील धानपिके संकटात आली आहे. शनिवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. जवळपास अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील धानपिकाला आणि फळबागांना बसला आहे.
सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरु आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतातील धान कापणी करुन बांध्यामध्ये पडले आहे. या धानाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला.