गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:24+5:30
गोंदिया जिल्हाचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्याने जिल्ह्यातील बरेच व्यवहार शिथिल होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रादुभार्व टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मात्र काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने देशातील ‘लॉकडाऊन’मध्ये पुन्हा दोन आठवड्यांनी वाढ केली असून देशातील विविध जिल्ह्यांचे तीन झोनमध्ये विभाजन केले आहे. यात गोंदिया जिल्हाचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्याने जिल्ह्यातील बरेच व्यवहार शिथिल होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रादुभार्व टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मात्र काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात मागील २२ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये केला आहे. राज्यात केवळ सहा जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये असून त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस व अन्य विभागांनी केलेले संयुक्त पॉझिटिव्ह प्रयत्न आणि जिल्हावासीयांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेतलेली खबरदारी या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.
जिल्ह्यात २६ मार्च रोजी पहिला कोरोना बाधीत रु ग्ण आढळल्यानंतर याचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या याचे देखील हे फलित आहे. यासर्व गोष्टींमुळेच तब्बल २ महिन्यानंतर जिल्ह्यातील व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे व्यावसायीकांसह यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आतापर्यंत २४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १० स्वॅब नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
३७ व्यक्ती शासकीय क्वारंटाईन कक्षात
जिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ३७ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे नऊ, ग्राम चांदोरी येथे १२, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे नऊ, ग्राम डव्वा येथील समाज कल्याण निवासी शाळेत सहा तर ग्राम बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ३७ व्यक्तींचा समावेश आहे.