मुलांना आवडते विषय शिकण्याची संधी द्यावी
By Admin | Updated: July 5, 2014 01:01 IST2014-07-05T01:01:12+5:302014-07-05T01:01:12+5:30
शिक्षकापेक्षा प्राथमिक मुलांना अधिकची माहिती असते. मुलांना आवडते विषय शिकू द्यावे.

मुलांना आवडते विषय शिकण्याची संधी द्यावी
काचेवानी : शिक्षकापेक्षा प्राथमिक मुलांना अधिकची माहिती असते. मुलांना आवडते विषय शिकू द्यावे. मुलांना कोणत्या विषयात आवड आहे, त्याची माहिती शिक्षकांनी घ्यावी. प्रशिक्षणाच्या वेळी आम्ही शिकवणी पुस्तिका पुरवितो, त्यांचे शिक्षकांनी वाचन करावे, असे मत एन.सी.ई.आर.टी. (डायट पुणे) विभाग पुणेचे प्रतिनिधी पिल्लई यांनी व्यक्त केले.
तिरोडा येथील जि.प. हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गाचे प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार शैक्षणिक सत्र २०१३-१४ करिता तिसऱ्या वर्गाच्या शिक्षक प्रशिक्षणाला निरीक्षक म्हणून त्यांनी भेट दिली. यानंतर एक तास घेतलेल्या मार्गदर्शन तासिकेत पिल्लई बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ तयार करण्यात आला. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ देशात १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या मदतीने वर्ग १ ते ८ करिता पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम विकसीत करण्यात आला आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात पहिली व दुसरी आणि २०१४-१५ ला तिसरी व चौथी असे टप्याटप्याने सुरू झाले आहे. पुणे डायटचे प्रतिनिधी आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षणात निरीक्षक म्हणून भेट देणारे पिल्लई पुढे म्हणाले की, लोणावळामध्ये ७०० ते ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक वर्षात प्रशिक्षण घेतले आणि ते सर्व आपणास प्रशिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांला काहीच येत नाही, हे म्हणणे चुकीचे असून शिक्षकापेक्षा प्राथमिक मुलांना अधिकची माहिती असते. प्राथमिकमध्ये शिकणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीने कॅम्प्युटरचा डॉट काम पूर्ण केला. त्यामुळे त्या मुलीच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आले आहे.
सर्वच मुलांना संपूर्ण विषय आवडतील असे नाही. याकरिता विद्यार्थ्यांना आवडणारे विषय शिकू द्यावे किंवा संधी द्यावी. मुलांना कोणत्या विषयात अधिकची आवड आहे, त्याची जाणीव शिक्षकांनी करून घ्यावी. अध्यापन करताना मुलांना समजेल अशी माहिती परिसरातील उदाहरणांवरून द्यावी. देशाच्या प्रगतीकरिता मुलांचा, शाळेचा अधिकाधिक विकास करावा. आपल्या समक्ष मुलांना न्याय देण्याची जबाबदारी आहे, ती योग्य रितीने पार पाडून मुलांना न्याय द्यावे, असेही पिल्लई म्हणाले.
यावेळी डायट गोंदियाचे अधिव्याख्याता डॉ. सोनारे यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षक प्रशिक्षण वर्गाचे निरीक्षण व मार्गदर्शन करताना डी.एड. दांडेगावचे प्राचार्य एस.एम.अंबुले, डॉ. आर.आर. सोनारे, गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे, शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरित, डी.बी. साकुरे, विषयतज्ञ ब्रजेश मिश्रा, पी.एस. ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)