घोटीचे सरपंच जितेंद्र डोंगरे पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:22 IST2019-07-11T22:21:36+5:302019-07-11T22:22:11+5:30
तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला.

घोटीचे सरपंच जितेंद्र डोंगरे पायउतार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला.
घोटी ग्रामपंचायतची सदस्य संख्या ११ आहे. मागील साडेतीन वर्षांपूर्वी जितेंद्र डोंगरे यांची सरपंच पदासाठी बहुमताने निवड करण्यात आली होती. मात्र सरपंच डोंगरे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे ही इतर सदस्यांना विश्वासात न घेता केली. स्वत:च निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
दरम्यान उपसरपंच संगीता भूमेश्वर कटरे, सदस्य नंदाबाई रामटेके, प्रिती कतलाम, इंदूबाई गिरीपुंजे, प्रमिला भागचंद बिसेन, तेजेश्वरी टेकाम, सविता गौतम, हेमराज बोंडे या आठ सदस्यांनी मिळून ४ जुलै रोजी गोरेगावचे तहसीलदार शेखर पुनसे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.
तर सर्व आठही सदस्य सहलीला गेल्याची चर्चा होती. दरम्यान तहसीलदार शेखर पुनसे यांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालय घोटी येथे विशेष सभा घेतली.
यामध्ये जितेंद्र डोंगरे यांच्या बाजूने ११ पैकी केवळ ३ मते पडली. त्यामुळे दोन तृतीयांश मताने अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे सरपंच जितेंद्र डोंगरे यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शेखर पुनसे होते. सहकारी म्हणून नायब तहसीलदार एन. एम.वेदी यांनी काम पाहिले.