आपल्या बालकांचे लसीकरण करवून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:12+5:30
गोंदिया जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष २.० अंतर्गत ० ते २ वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच वीट भट्टयामधील, स्थलांतरीत झालेले लोक, मजूरवस्ती इत्यादी ठिकाणच्या २ वर्षांतील बालकांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेवून त्यांना संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.

आपल्या बालकांचे लसीकरण करवून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मिशन इंद्रधनुष २.० लसीकरण मोहिमेची तिसरी फेरी आता राबविली जाणार आहे. या लसीकरणामुळे सात प्रकारच्या आजारांपासून रक्षण होत असल्याने आपल्या बाळांचे लसीकरण करवून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन इंद्रधनुष २.० तिसरी फेरी अंतर्गत जिल्हा टास्क फोर्सच्या सभेत गुरूवारी (दि.३०) अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर निमगडे, माता बालसंगोपन अधिकारी नितीन कापसे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. दयानिधी यांनी, लसीकरणापासून सुटलेल्या व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांची यादी तयार करु न १०० टक्के बालकांना संपूर्ण लसीकरण करण्याचे निर्देश दिले. डॉ. निमगडे यांनी, या फेरीत जिल्ह्यात ८८ बालके व ८ गरोदर मातांचे अर्धवट लसीकरण झालेले असल्यामुळे किंवा लसीकरणापासून वंचित असल्यामुळे त्यांना नियमित लसीकरण सत्रा व्यतिरिक्त, ३६ अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये लसीकरण करण्यात येईल असे सांगीतले.
गोंदिया जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष २.० अंतर्गत ० ते २ वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच वीट भट्टयामधील, स्थलांतरीत झालेले लोक, मजूरवस्ती इत्यादी ठिकाणच्या २ वर्षांतील बालकांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेवून त्यांना संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.
ही मोहीम चार टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असून चौथी फेरी माहे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. क्षयरोग, न्युमोनिया, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, मेंदूज्वर व गोवर या सात आजारांपासून बचाव करण्याकरीता बाळांना लसीकरण केले जाते.