गंगाबाईला २७ वर्षांपासून रक्तविलगीकरण कक्षाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:19+5:302021-03-29T04:17:19+5:30

गंगाबाई स्त्री रुग्णालयातील रक्तसंक्रमण पेढीने अनेकांना एचआयव्हीबाधित केले. येथील एचआयव्ही दूषित रक्ताचा पुरवठा बराच गाजला होता. गरिबांच्या कल्याणासाठी असलेल्या ...

Gangabai has been waiting for blood transfusion room for 27 years | गंगाबाईला २७ वर्षांपासून रक्तविलगीकरण कक्षाची प्रतीक्षा

गंगाबाईला २७ वर्षांपासून रक्तविलगीकरण कक्षाची प्रतीक्षा

गंगाबाई स्त्री रुग्णालयातील रक्तसंक्रमण पेढीने अनेकांना एचआयव्हीबाधित केले. येथील एचआयव्ही दूषित रक्ताचा पुरवठा बराच गाजला होता. गरिबांच्या कल्याणासाठी असलेल्या या रक्तपेढीतील गोरखधंदा अनेक वेळा चव्हाट्यावर आला. या रक्तसंक्रमण पेढीकडे शासन व अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या दुर्लक्षाची साक्ष येथील रक्तविलगीकरण कक्ष नसणे देते. गंगाबाईतील रक्तसंक्रमणपेढी जिल्ह्यातील एकमेव रक्तपेढी आहे. गरीब, गरजू व अतिजोखमीच्या रुग्णांचा भार या रक्तपेढीवर आहे. या रक्तपेढीमार्फत रक्त संकलन करण्यात येते. कोरोनाच्या कालावधीत रक्तदाते कमी पडले आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्त मिळवून देणारे दलालही गंगाबाई स्त्री रुग्णालयात आहेत. रक्तदान शिबिरे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आयोजित करून गंगाबाईतील रक्तपेढीला रक्त संकलनासाठी बोलावले, तर येथील डॉक्टर व टेक्निशियन यांना जाता येत नाही. सर्व सेवायुक्त अत्याधुनिक रक्तवाहिका नसल्याने रक्तपेढीचे कर्मचारी- अधिकारी उपस्थित राहू शकत नाहीत.

रक्तसंकलनासाठी लागणारे एकही डोनकाऊच उपलब्ध नाही. पूर्वीचाच ताण असलेल्या या रक्तपेढीत आयआयव्ही दूषित रक्त शोधण्यासाठी असलेल्या एलाईझा मशीन, फ्रीज व किट यांची गरज आहे. १९९३ मध्ये गंगाबाई रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्यात आली. या रक्तपेढीला २७ वर्षांचा कालावधी उलटूनही येथे रक्तविलगीकरण होत नाही. मागील ७ वर्षांपूर्वी रक्तविलगीकरण कक्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाने ३५ लाख रुपये दिले; परंतु त्याचे बांधकाम आता सुरू करण्यात आले. रक्तविलगीकरण युनिट सुरू झाल्यास येथील रक्तसंकलन वाढेल. रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रक्तविलगीकरण युनिटमुळे प्लेटलेट, प्लाझमा, लाल रक्तपेशी रक्तातील हे सर्व घटक वेगवेगळे करून ज्या रुग्णांना ज्या घटकांची गरज आहे ते पुरविणे सहज शक्य होईल.

बॉक्स

अमृत योजना फसवी ठरली

गोंदिया जिल्ह्यातील गरोदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. या शासकीय रक्तसंक्रमण पेढीद्वारे गरोदर माता, सिकलसेल, थॅलेसिमियाचे रुग्ण, एक वर्षाखालील बालके, बीपीएलधारक रुग्ण व ऐच्छिक रक्तदान करणाऱ्या लोकांना मोफत रक्त पुरविले जाते. शासकीयपेक्षा खासगी रुग्णालयातील रुग्णांना अधिक मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांना डावलून खासगी रुग्णालयातील श्रीमंत रुग्णांना हा मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. गंगाबाईतील किंवा केटीएस रुग्णायातील रुग्णांना रक्त उपलब्ध नसल्याचे सांगून टाळले जाते. त्यामुळे अमृत योजना ही रुग्णांसाठी फसवी ठरली आहे. या योजनेतील किती रुग्णांना रक्त देण्यास टाळण्यात आले याची आकडेवारी मात्र गंगाबाईतील रक्तसंक्रमण पेढीकडून लपविण्यात आली आहे.

Web Title: Gangabai has been waiting for blood transfusion room for 27 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.