गोंदिया जिल्ह्यात नव्याने बांधलेल्या विहिरीत गुदमरून पिता-पुत्रासह दोन शेजारी मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:03 IST2020-07-02T11:45:31+5:302020-07-02T13:03:24+5:30
गोंदिया जिल्ह्यात विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सालेकसा तालुक्यातील देवरी पानगाव येथे घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात नव्याने बांधलेल्या विहिरीत गुदमरून पिता-पुत्रासह दोन शेजारी मृत्युमुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: नव्यानेच बांधलेल्या विहिरीचे पूजन करण्यासाठी विहिरीतीतले पाणी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या पिता-पुत्रासह दोन शेजाºयांना आपले प्राण गमावावे लागल्याची धक्कादायक घटना सालेकसा येथे घडली.
आमगाव तालुक्यातील कन्हारटोला येथे रहात असलेल्या भांडारकर पिता-पुत्रासह दोन शेजाऱ्यांचा २ जुलैला सकाळी करुण अंत झाल्याची घटना घडली. आत्माराम भांडारकर यांनी आपल्या घरासमोर विहीर बांधली होती. तिचे पूजन करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी १ रोजी संध्याकाळी विहिरीचे पाणी स्वच्छ करण्याच्या हेतूने विहिरीत ब्लिचिंग पावडर, फिटकरी, तुरटी यांचे मिश्रण टाकले होते. विहिरीतले गढूळ व अस्वच्छ पाणी काढण्यासाठी मोटर पंप लावण्यात आली होती. या मोटारीचा फूटवॉल काढण्यासाठी त्यांचा मुलगा झनकलाल हा विहिरीत उतरला. मात्र उतरल्याबरोबर त्याला अस्वस्थ वाटू लागले व तो कसातरी करू लागला. ते पाहताच आत्माराम हेही विहिरीत उतरले. काही क्षणातच दोघेही गतप्राण झाले.
ही घटना पाहणाऱ्या एका मुलाने तात्काळ शेजाऱ्यापाजाऱ्यांना आवाज दिला. ते ऐकून राजू भांडारकर व धनराज गायधने हे दोघेही विहिरीत उतरले. मात्र त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला. या चौघांसोबतच राधेशाम नावाचा व्यक्तीही विहिरीत उतरत होता. मात्र अर्ध्यावर उतरल्यानंतर विहिरीतील विषारी वायूची गंभीरता लक्षात आल्याने तो वरती परत आला.
ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. या चौघांच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.