अन्न व औषध विभागाची फक्त एकच कारवाई
By Admin | Updated: October 28, 2014 22:58 IST2014-10-28T22:58:04+5:302014-10-28T22:58:04+5:30
दिवाळीच्या दिवसांत मिष्ठान्नांत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचा गोंदिया शहराचा इतिहास आहे. असे असतानाही मात्र यंदाच्या दिवाळीत अन्न व औषध

अन्न व औषध विभागाची फक्त एकच कारवाई
नागपूरच्या अधिकाऱ्यांना गोंदियाचा प्रभार : भेसळ फोफावल्याची शक्यता
गोंदिया : दिवाळीच्या दिवसांत मिष्ठान्नांत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचा गोंदिया शहराचा इतिहास आहे. असे असतानाही मात्र यंदाच्या दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात भेसळ तपासणीची फक्त एकच कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाकडून काहीच ठोस पाऊलं उचलण्यात येत नसल्याचे बघून मोठ्या प्रमाणात भेसळ फोफावली असल्याचे व दिवाळीत शहरवासीयांनी भेसळयुक्त मिष्ठान्नांचे सेवन केले असे बोलणे वावगे ठरणार नाही. एकंदर अन्न व औषध प्रशासनाचा अफलातून कारभार मात्र शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अन्न व औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास विभागाकडून कारवाई करून भेसळीचे प्रकार रोखले जातात. दिवाळीत मोठया प्रमाणात मिष्ठान्नांची उलाढाल होते. या मिष्ठान्नांत येथील काही विक्रेते भेसळयुक्त व शिळा खवा, पनिर, दूध व अन्य पदार्थांचा वापर करतात.
विशेष म्हणजे हा प्रकार खुद्द विभागानेच मध्यंतरी कारवाया करून उघडकीस आणला होता. त्यानुसार यंदाही भेसळयुक्त पदार्थांपासून मिष्ठान्न तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र असे असतानाही विभागाकडून काही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले नाही.
येथील अन्न व औषध विभागात अफलातून कारभार सुरू आहे. येथे विभागाचे कार्यालय आहे मात्र मनुष्यबळ नसल्याने भंडारा कार्यालयातील फक्त एक लिपीक येथे येतो. त्यांना काहीच अधिकारी नसल्याने ते फक्त दिवस घालवून सायंकाळी परत निघून जातात. शिवाय धक्कादायक बाब अशी की, गोंदिया जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नागपूरचे अधिकारी प्रवीण उमप यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. त्यांना नागपूर सांभाळून गोंदियाकडेही लक्ष द्यायचे आहे.
अशात उमप यांनी १८ आॅक्टोबर रोजी शहरातील सिव्हील लाईंसमधील आकाशगंगा डेअरीवर कारवाई करून त्यांच्याकडील दुध व खव्याचे सॅम्पल घेतले. घेण्यात आलेले सॅम्पल मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे उमप यांनी सांगीतले. यानंतर मात्र उमप नागपूरला निघून गेले व परत न आल्याने येथील डेअरीवाल्यांना रान मोकळे होते. नेमका याचाच फायदा घेत मिष्ठान्न तयार करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिष्ठान्न तयार करून शहरवासीयांपुढे मांडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकारातून मात्र विभागाची लचर कार्यप्रणाली पुढे येते. विभागाकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता मात्र सामान्य नागरिकांच्या जिव्हारी येत असल्याचाच हा प्रकार आहे. (शहर प्रतिनिधी)