परसवाडा : मारबतनिमित्ताने करटी-खुर्द येथे जुगार खेळत असलेल्या पाच जुगाऱ्यांना धाड घालून पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तिरोडा पोलिसांनी मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ६.३० वाजता कारवाई केली असून, जुगाऱ्यांकडील एक लाख १३ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला आहे.
करटी-खुर्द येथील वैनगंगा नदी काठावरील संतोषी माता मंदिराच्या मागे काही जण जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, पोउपनि राधा लाटे, नापोशी रक्षे, मुकेश थेर, वाढे, शिपाई पंकज सवालाखे, इरफान शेख यांनी धाड घातली. याप्रसंगी ओंकार पुंडलिक गावंडे (४६), वसंत महादेव कडू (५२), जितेंद्र प्रभुदास घरजारे (३०), अनंत गोपाल श्रीरंग (३४) व सोमेश्वर कुंडलिक गावंडे (३८, रा. करटी खुर्द) हे जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील ५२ तासपत्ते, रोख २३०० रुपये, ३ मोबाइल हॅण्डसेट आणि ३ मोटारसायकली असा एकूण एक लाख १३ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम १२ (अ ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली. तर घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.