अखेर एफडीएचे पत्रक धडकले
By Admin | Updated: September 2, 2016 23:58 IST2016-09-02T23:58:16+5:302016-09-02T23:58:16+5:30
गणेशोत्सवात महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक असतानाही प्रशासनाकडून काहीच हालचाली नव्हत्या

अखेर एफडीएचे पत्रक धडकले
महाप्रसाद वितरणासाठी नोंदणी : पत्रकातून दिल्या मार्गदर्शक टिप्स
गोंदिया : गणेशोत्सवात महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक असतानाही प्रशासनाकडून काहीच हालचाली नव्हत्या किंवा तसे आवाहन करण्यात आले नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून एफडीएचे हे दुर्लक्ष उजेडात आणताच विभागाकडून शुक्रवारी (दि.१) पत्रक धाडण्यात आले. या पत्रकातून एफडीएने महाप्रसादाचे आयोजन करताना परवानगी घेण्याचे आवाहन करीत मार्गदर्शक टिप्स दिल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वितरण केले जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी या महाप्रसादाचा मोठा आधार होतो. मात्र महाप्रसादातून कित्येकदा विषबाधेचेही प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अशात मात्र महाप्रसाद वितरण करणारे मंडळ आपले हातवर करतात. असले प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत आजवर अन्न व औषध प्रशासनाकडून ना जाहीरात ना पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. परिणामी गणपती उत्सव मंडळांकडून आपल्या मर्जीने महाप्रसाद वाटपाचे पुण्य कमाविले जाते.
महाप्रसादाची एफडीएची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे बोलले जात असतानाही एफडीएकडून याविषयी काहीच हालचाली नव्हत्या. यावर ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि.१) बातमीच्या माध्यमातून हा प्रकार उजेडात आणला. कित्येक लोकांच्या आरोग्याच्या या महत्वपूर्ण अशा या बाबीला घेऊन अन्न व औषध प्रशासन किती गंभीर आहे याची प्रचिती त्यांच्या या कार्यातून आली. विशेष म्हणजे ही बातमी प्रकाशित होताच अन्न व औषध प्रशासनाकडून शुक्रवारीच (दि.१) महाप्रसादाच्या परवानगीसाठी पत्रक धाडण्यात आले. या पत्रकातून प्रशासनाने महाप्रसाद वितरणासाठी मंडळांना आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)
सहकार्य करण्याचे आवाहन
अन्न व औषध प्रशासनाकडून गणपती मंडळांना महाप्रसाद वितरणासाठी काही टिप्स दिल्या आहेत. यात प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा कच्चा माल परवानाधारक व नोंदणीकृत व्यवसायीकांकडूनच खरेदी करावे, प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावी, फळांचा वापर होत असल्यास कच्चे व सडलेले फळ वापरू नये, आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी, प्रसादासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे, प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास अॅप्रन, ग्लोव्हज, टोपी पुरविण्यात यावी व हात स्वच्छ धुवावेत, प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक कुठल्याही त्वचा रोग व संसर्गजन्य रोगमुक्त असावा, प्रसादात खवा-मावा सारखे नाशवंत पदार्थ उपयोगात आणले असता विशेष काळजी घ्यावी तसेच मंडळांनी प्रसादाचा कच्चामालाचे बील, प्रसाद बनविणारे व वितरण करणारे स्वयंसेवकांचे नाव व पत्ता तयार ठेवावा. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळांकडून परवानगी वांद्यात
अन्न व औषध प्रशासनाकडून मागील वर्षीही अशाचप्रकारे दुर्लक्ष करण्यात आले होते व परिणामी एकाही मंडळाने परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. तोच प्रकार यंदाही घडला. मात्र ‘लोकमत’च्या बातमीमुळे अन्न व औषध प्रशासनाला जाग आली व त्यांनी पत्रक पाठवून मंडळांना नोंदणीचे आवाहन केले. मात्र उत्सवाच्या दोन दिवसापूर्वी प्रशासनाकडून पत्रक पाठविण्यात आल्याने यंदाही मागील वर्षी सारखाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.