लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ई-रिक्षाची बॅटरी चार्जिंग करताना करंट लागून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्ड येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी घडली. नरेश बरीयेकर (५५) असे वडिलाचे तर दुर्गेश नरेश बरीयेकर बारीकर (२२) असे मृतक मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार नरेश बरीयेकर (५५) हे तिरोडा शहरात दिवसभर ई-रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते नेहमीप्रमाणे सोमवारी दिवसभर ई-रिक्षा चालवून सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी ई-रिक्षाची बॅटरी चार्ज करण्याकरिता लावायच्या प्रयत्न केला. दरम्यान, जवळच असलेल्या जिवंत विद्युत प्रवाह हा शेड आणि शटरमधून प्रवाहित झाला व नरेश बरीयेकर यांचा चुकून शटरला स्पर्श होऊन त्यांना विजेचा धक्का लागताच ते मला वाचवा असे ओरडू लागले. वडिलांना वाचवण्यासाठी घरीच असलेला त्यांचा मुलगा दुर्गेश नरेश बारीकर (२२) हा मदतीसाठी धावून गेला. यात त्यालाही विजेचा धक्का बसला व काही क्षणातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती शेजारी व परिसरातील लोकांना कळताच ते घटनास्थळी धावून गेले. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तिरोडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमित वानखेडे आपल्या पथकासह या घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी मर्ग दाखल केल्याची माहिती तिरोडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांनी दिली. मंगळवारी (दि. २३) रोजी तिरोडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय दुर्गेश आणि नरेश बरीयेकर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
बरीयेकर यांच्या कुटुंबावर संकट
नरेश बरीयेकर (५५) यांच्या कुटुंबात पती-पत्नी आणि मुलगा असे तिघेच तिरोडा येथील संत रविदास वॉर्ड येथे वास्तव्यास होते. नरेश बरीयेकर यांचा मुलगा दुर्गेश यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. तोपण आपल्या वडिलाला ई-रिक्षा चालविण्यासाठी मदत करीत होता. मात्र सोमवारी पती व मुलाचा मृत्यू झाल्याने पत्नी रेखा बरीयेकर यांच्यावर मोठे संकट कोसळले असून, आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
"विद्युत धक्का लागून बापलेकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच तिरोडा येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच याची माहिती वरिष्ठांना कळविले. सदर घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली नसून खासगी वीज वापर होत असलेल्या ग्राहकांकडून घडली आहे. त्यामुळे यात नियमानुसार जी मदत दिली जाते ती देण्याचा प्रयत्न करू."- व्ही. ताकसांडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण