शेतीच्या कामासाठी दुचाकीवर निघालेल्या बाप-लेकाला भरधाव ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 20:14 IST2023-06-24T20:13:40+5:302023-06-24T20:14:14+5:30
Gondia News राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील डोंगरगाव डेपो येथे नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने सामोर जात असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की मोटारसायकलस्वार बाप-लेक ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेले.

शेतीच्या कामासाठी दुचाकीवर निघालेल्या बाप-लेकाला भरधाव ट्रकने चिरडले
गोंदिया: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील डोंगरगाव डेपो येथे नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने सामोर जात असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की मोटारसायकलस्वार बाप-लेक ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेले. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास देवरी-रायपूर महामार्गावरील डोंगरगाव डेपोजवळ घडली. सुनील पोगळे (३५) व सेवकराम पोगळे (६०, रा. लोहारा) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी असलेले सुनील पोगळे व सेवकराम पोगळे हे दोघेही बाप-लेक शनिवारी नागपूरवरून शेतीच्या कामासाठी स्वगावी लोहारा येथे मोटारसायकलवरून (क्र. एमएच ३५-डब्ल्यू ०३२८) जात होते. दरम्यान, मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. सीजे ८८२२) मोटारसायकलला डोंगरगाव डेपोजवळ जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मोटारसायकलस्वार बाप-लेक ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळापासून १ किमी अंतरावर ट्रक उभा करून पसार झाला. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी या घटनेची माहिती देवरी पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. या घटनेमुळे लोहारा गावात शोककळा पसरली आहे.
शेतीच्या कामासाठी येत असताना झाला घात
सेवकराम पोगळे हे कुटुंबासह मागील काही वर्षांपासून नागपूर येथे राहतात. ते तिथे एका कंपनीत काम करतात. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने ते शेतीची कामाची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि. २४) मुलासह मोटारसायकलने लोहारा येथे येत होते. दरम्यान, गावाकडे जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने दोघा बाप-लेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पोगळे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
लोहारा येथे असायचा मुक्काम
सेवकराम पोगळे हे कुटुंबीयांसह नागपुरात राहत असले तरी वर्षांतून ते अनेकदा लोहारा येथे यायचे. येथे ते आठ-आठ दिवस मुक्कामी सुद्धा राहत होते. लोहारा शेती असल्याने ते शेती करण्यासाठी नेहमी ये-जात करीत असल्याचे लोहारा येथील गावकऱ्यांनी सांगितले.