धानपिकाच्या खरेदी-विक्रीत शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त
By Admin | Updated: November 16, 2014 22:53 IST2014-11-16T22:53:05+5:302014-11-16T22:53:05+5:30
जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन्

धानपिकाच्या खरेदी-विक्रीत शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त
परसवाडा : जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त अशी स्थिती आहे. आता शासन व्यापाऱ्यांबद्दल कोणते पाऊल उचलते का? असा सवाल शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विचारला आहे.
भारत कृषिप्रधान देश आहे. येथील जनतेचे जीवन कृषीवरच अवलंबून आहे. पण शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला कोणीच तयार नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान, पाणी व इतर बाबींवर अवलंबून पीक घेतले जाते. अधिकतर खाद्योपयोगी वस्तू, पीक भारतात तयार होते. पण काही पिकांना प्रोसेसिंग करून तयार केले जाते. त्यांना थोडीफार कशीतरी किंमत मिळते. पण शेतकऱ्यांना डच्चूच दिल्या जातो. जे शेतकरी आपल्या मुलाबाळांसह रात्रंदिवस राबराब राबतात, त्यांच्या पिकांना कधीही भाव मिळत नाही, ही येथील शोकांतिका आहे.
डब्बेटोला येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. रामलाल दुर्गा पारधी यांचे पुत्र सूरजलाल रामलाल पारधी (६५) यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, आम्ही स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे फायदे घेतलेच नाही. आणि आता शेतात मरमर करूनही फायदा मिळत नाही. आठ एकर शेती असूनही कधी पिकांना भाव नाही तर कधी कर्जबाजारी व्हावे लागते. कधी पाणी नाही तर कधी पिकांना कीड लागते. खत, औषधी व मजुरांचे दर गगणाला भिडले. अशात जिल्ह्यातील धान पिकाला भाव किती मिळतो? कधी हजार तर कधी नऊशे! हमी भाव तर गायबच झाले. तसेच हमी भावासाठी डंका पिटणारे शेतकरी पुत्रही गायबच झाले.
४० वर्षांपूर्वी २० रूपये क्विंटल धानाला भाव होता. मजुरांना एक कुडो धान देत असत. तरीही परवडत असे. मजुरी कमी, रासायनिक खतांचा वापर कमी, दरसुद्धा कमी. सर्व कमीच असायचे. पण आजघडीला उत्पादन जास्त असूनही परवडत नाही. खत, पाणी, वीज, औषधीचे दर व इतर सोयींचा हिशेब केला तर शेतकऱ्यांच्या हाती शून्य हिशेब येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, कसे येतील त्यांचे चांगले दिवस, असे प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे आहेत. मात्र चांगले दिवस तर आले, पण ते व्यापारी वर्गाचे. हमी भावही गेले, खरेदी केंद्रही गेले, सर्वकाही गेले आणि नेते गप्पच बसून राहिले. शेतात बोअर करून पाणी काढले. कर्जही काढले आणि आता परतफेडीचा प्रश्न समोर आहे.
पीकही आले, पण खर्च केलेले पैसे व पिकांचे पैसे बरोबर झाले. मेहनतही गेली आणि कर्जबाजारी झाले. आता ते पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचा वालीसुद्धा कुणी नाही. अशा शब्दात वयोवृद्ध शेतकरी सूरज पारधी यांनी आपल्यासह इतर शेतकऱ्यांची व्यथा कथन केली. (वार्ताहर)