पाण्यासाठी शेतकऱ्यांची धापेवाडा कार्यालयावर धाव
By Admin | Updated: August 27, 2016 00:07 IST2016-08-27T00:07:03+5:302016-08-27T00:07:03+5:30
निसर्गाने पाठ फिरवली. शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची अवस्था अतिशय वाईट होत असल्याने

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धापेवाडा कार्यालयावर धाव
विद्युत पुरवठा खंडित: १७.५० लाखांची थकबाकी
काचेवानी : निसर्गाने पाठ फिरवली. शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची अवस्था अतिशय वाईट होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी धापेवाडा प्रकल्प कार्यालय गाठले. जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात चार तास अधिकाऱ्यांशी चर्चा करुन समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली.
कवलेवाडा क्षेत्राचे जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे, ३० दिवसापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतातील पिके मृत्यू पावत आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. परंतु धापेवाडा सिंचन प्रकल्पाकडून पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची कार्यकारी अभियंता यांचे स्वीय सहाय्यक डी.ए. बोरकर, उपविभागीय अभियंता धापेवाडा टप्पा -१ चे सुरेश कुकडे यांच्याशी चर्चा केली.
पाणी सोडण्यात आले नाही तर संपूर्ण धान जळून राख होईल असे शेतकरी म्हणाले. अधिकारी सुरेश कुकडे आणि डी.ए. बोरकर यांनी विद्युत कनेक्शनची समस्या शेतकऱ्यांसमक्ष ठेवली. विद्युत कपात करण्यात आली होती तेव्हा विद्युत विभागाने ५ टप्पे तयार करुन मार्च २०१६ अखेर चार टप्यातील किस्त भरण्यात आली. मात्र शेवटची किश्त २.५० लाख रुपये भरण्यात आले नाही. त्यामुळे विद्युत विभागाने विद्युत कपात केली. आजघडीला धापेवाडा प्रकल्पावर विद्युत थकबाकी १७ लाख ५० हजार रुपये आहे. परंतु यापैकी ६ लाख २ हजार रुपये भरल्यास वीज पुरवठा सुरू केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वीचे २ लाख ७५ हजार रुपये कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. दोन दिवसात शेतकऱ्यांकडून वसुलीद्वारे आलेले २ लाख १० हजार असे मिळून ४ लाख ८५ हजार जमा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वसुली अधिकाऱ्यांना बोलावून दोन दिवसात वसूली करण्यात यावी असे अधिकारी व जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी वसुलदारांना खडसावून सांगीतले. यावेळी कवलेवाडा सरपंच देवन पारधी, किरण पारधी, मुरली कटरे, रामू पारधी, गणेश पटले, मुंडीपारचे वासू हरिणखेडे, रंगलाल रहांगडाले, चिरेखनीचे सोनू पारधी, गिरधारी भगत, गंगाराम टेंभरे, मरारटोलाचे बंडू कटरे, सरपंच कुंजीलाल बिसेन, भाऊजी पटले व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)
पाणीपट्टीचे उत्पन्न ७८ लाख
विद्युत बिल भरण्यास अडथळा येण्याचे कारण शेतकऱ्यांकडे येणारे पाणी पट्टीचे शुल्क वेळेत भरणा होत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाळी पीकाची पाणी पट्टी ४२ लाख रुपये आकारण्यात आली. त्यापैकी २५ लाख वसूल झाले. १७ लाख अप्राप्त आहे. वर्षाला खरीप पिकाची पाणी पट्टी आकारणी ७७.६८ लाख होते. एप्रिल महिन्यात एकाच महिन्याचा बिल ९ लाख रुपये आला होता. पंप बंद असतात त्यावेळचा सरासरी बिल २० हजार रुपये महिना येतो. वर्षाला विद्युत बील ८० लाखाच्या घरात जातो. यावर्षी ६५ लाख रुपये बिल भरण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चवथे पंप जानेवारीपासून बंद
धापेवाडा प्रकल्प विभागाच्या हलगर्जीपणामुळे चौथे पंप जानेवारी २०१६ पासून बंद पडून आहे. चौथे पंप बंद असल्याने टेलवर असणाऱ्या शेतकऱ्यांना बरोबर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत पाण्यासाठी वाद होत आहेत.