शेतकरी अपघात विम्याचा दावा ग्राहक मंचात ग्राह्य
By Admin | Updated: November 25, 2014 22:57 IST2014-11-25T22:57:02+5:302014-11-25T22:57:02+5:30
शेतकरी अपघात विम्याच्या दोन प्रकरणांत दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नाकारलेला विमा दावा जिल्हा ग्राहक न्यायमंचाने ग्राह्य धरला. त्यामुळे सदर विमा कंपनीला दोन्ही प्रकरणातील मृत

शेतकरी अपघात विम्याचा दावा ग्राहक मंचात ग्राह्य
न्यू इंडिया इन्शुरन्सला झटका : दोन प्रकरणांत प्रत्येकी एकेक लाख मिळणार
ंगोंदिया : शेतकरी अपघात विम्याच्या दोन प्रकरणांत दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नाकारलेला विमा दावा जिल्हा ग्राहक न्यायमंचाने ग्राह्य धरला. त्यामुळे सदर विमा कंपनीला दोन्ही प्रकरणातील मृत शेतकऱ्यांच्या पत्नीला प्रत्येकी एकेक लाख रूपये विमा दाव्याची रक्कम १२ व ९ टक्के दरसाल दरशेकडा व्याजदराने देण्याचा आदेश दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, चांदणीटोला येथील रहिवासी रामेश्वर मोहन भारती यांच्या मालकीचे शेत आहे. ५ मे २०१३ रोजी त्यांचा शेतातील विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. दुसऱ्या प्रकरणातील शेतकरी मरारटोला येथील नऊ कोल्हू माने हे असून १६ फेब्रुवारी २०१३ रोजी बालाघाटकडून गोंदियाकडे येताना समोरून येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
त्यामुळे रामेश्वर यांची पत्नी रूपाली व माने यांची पत्नी जायत्रा यांनी शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा प्रस्ताव सादर केला. मात्र सदर दोन्ही प्रकरणे विमा कंपनीने फेटाळल्याने त्यांनी ग्राहक न्यायमंचात धाव घेवून तक्रार दाखल केली व मंचामार्फत सदर विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली.
यानंतर सदर विमा कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले. पहिल्या प्रकरणात शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला, त्यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत. शिवाय ९० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्यात आली नाही असे कारण दिले. दुसऱ्या प्रकरणात शेतकऱ्याच्या पत्नीने अत्यावश्यक दस्तावेज सादर न केल्यामुळे दोन्ही दावे फेटाळण्यात आले, असे दि न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
मात्र रूपाली भारती यांनी तक्रारीसह शेतकरी अपघात विमा योजना २०१२-१३ चे परिपत्रक, तलाठ्याचे प्रमाणपत्र, शेतीचा सात-बारा, फेरफार पत्रक, मर्ग बातमी, पंचनामा व उत्तरीय तपासणी अहवाल आदी कागदपत्रे दाखल केली. दुसऱ्या प्रकरणात तक्रारकर्ती जायत्रा माने यांनी शेतकरी अपघात विमा योजनेचा शासन निर्णय २०१२-१३, विमा योजनेचा क्लेम फॉर्म, तलाठ्याचे प्रमाणपत्र, फेरफार पत्रक, पंचनामा, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे शपथपत्र आदी सादर केले होते.
संबंधित कागदपत्रांनुसार तक्रारकर्त्यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी विमा दावा दाखल केला होता. परंतु तो दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याचे कसलेही पत्र विमा कंपनीने दिले नाही. ही सेवेतील त्रुटी होय. दुसऱ्या प्रकरणात त्यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचे पती नऊ माने हे अपघातात मरण पावले, हे पोलीस ठाण्याच्या व वैद्यकीय दस्तावेजावरून सिद्ध होते. शिवाय विमा कंपनीने इन्व्हेस्टीगेटरची नेमणूक करून चौकशी केली नाही. त्यामुळे ते विमा लाभ मिळण्यास पात्र आहेत.
ग्राहक न्यायमंचाने दोन्ही प्रकरणांची कारणमिमांसा करुन दोन्ही तक्रारी अंशत: मंजूर केल्या. ग्राहक न्यायमंचाने आपल्या न्यायनिवाड्यात पहिल्या प्रकरणात मृत शेतकऱ्याची पत्नी रूपाली रमेश भारती यांना शेतकरी अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये २३ एप्रिल २०१४ पासून दरसाल दरशेकडा १२ टक्के व्याजाने द्यावे; शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे; तर दुसऱ्या प्रकरणात जायत्रा माने यांना अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये १४ मे २०१३ पासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे; शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा असा आदेश दि न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीला दिला.
दोन्ही प्रकरणांत तक्रारकर्त्यांच्या बाजूने अॅड. उदय क्षीरसार यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)