गोंदिया जिल्ह्यात उत्साहपूर्ण मतदान; एकूण मतदान ७३.५५ टक्के मतदानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 22:26 IST2025-12-02T22:26:30+5:302025-12-02T22:26:30+5:30
गोंदिया 61.85 %, तिरोडा 65.62 % नगरपरिषदांमध्ये मतदान, तर सालेकसा 84.90 %, गोरेगाव 80.90% नगरपंचायतीमध्ये मतदान

गोंदिया जिल्ह्यात उत्साहपूर्ण मतदान; एकूण मतदान ७३.५५ टक्के मतदानाची नोंद
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व गोरेगाव, सालेकसा नगरपंचायतीमध्ये आज मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यात एकूण 73.55% मतदान झाले असून गोंदिया मध्ये 61.85% तिरोड्यांमध्ये 65.62%, साले कशामध्ये 84.90% तर गोरेगाव मध्ये 80.90% मतदान झाले. या मतदान प्रक्रियेमध्ये स्त्री, पुरुष, तरुण, वृध्द व नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करण्यासाठी आपला उत्साह दाखविला. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी काही मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. गोंदिया जिल्ह्यात न.प. हिंदी पूर्व माध्यमिक शाळा मरारटोली गोंदिया, जगत महाविद्यालय गोरेगाव व जि.प.शाळा मुरुमटोला (ता.सालेकसा) येथे पिंक बुथ स्थापन करण्यात आले होते. तर श्री महावीर मारवाडी प्राथमिक शाळा गोंदिया व लिटल बर्डस् स्कुल तिरोडा येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
जिल्ह्यात गोंदिया नगरपरिषद मतदार संख्या-124311, तिरोडा नगरपरिषद मतदार संख्या-26106 व सालेकसा नगरपंचायत मतदार संख्या-6810, गोरेगाव नगरपंचायत मतदार संख्या-8654 आहे. गोंदिया जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार नियोजित असलेला दि.3 डिसेंबर 2025 रोजीचा मतमोजणीचा दिनांक न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात येत आहे आणि सदर मतमोजणी सुधारित निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून होणार आहे.