अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST2020-12-12T05:00:00+5:302020-12-12T05:00:04+5:30
गेल्या वर्षीच्या दोन्ही हंगामातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदा धान खरेदी न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून महामंडळाने धान खरेदी करण्यास सुरुवात न केल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा विनोद पाटील गहाणे, योगेश नाकाडे, चेतन दहीकर, दिनेश पाटील रहांगडाले यांनी दिला आहे.

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास नकार
लाेकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : या वर्षीच्या खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने परिसरातील केशोरी, गोठणगाव, इळदा येथील विविध कार्यकारी संस्थेच्यामार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करुन धान् खरेदीस सातबारा घेवून सुरुवात केली आहे. परंतु या तिन्ही धान खरेदी केंद्रावर अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी केली जात नसल्यामुळे अतिक्रमणधारक शेतकरी अडचणीत आले आहे.
गेल्या वर्षीच्या दोन्ही हंगामातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदा धान खरेदी न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून महामंडळाने धान खरेदी करण्यास सुरुवात न केल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा विनोद पाटील गहाणे, योगेश नाकाडे, चेतन दहीकर, दिनेश पाटील रहांगडाले यांनी दिला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात खरीप हंगामात निघालेले धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने केशोरी, गोठणगाव, इळदा हे तिन्ही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. धान खरेदीसाठी ऑनलाईन पध्दतीचा सातबारा असणे अनिवार्य केले आहे. परंतु त्या सातबारामध्ये अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची नावे येत नाही.
सरकारी जागा अशी नोंद येत असल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे.
मागील वर्षी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण न करता धान खरेदी करण्यात आली होती. मग यावर्षीच धान खरेदी नकार घंटा का? असा सवाल अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी केला आहे. या परिसरातील अनेक अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसमोर धान विक्रीचे संकट निर्माण झाले आहे.
निर्णय घेण्यास विलंब
या संदर्भात काही शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता लवकरच धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले होते. परंतु तब्बल आठ दिवस लोटूनही धान खरेदीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येवून महामंडळाविषयी संताप व्यक्त करीत आहेत. येत्या चार दिवसात व्यवस्थापकीय अधिकारी यांनी अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची धान खरेदीचा निर्णय घेतला नाही तर महामंडळाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.