अठरा दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:05+5:30
प्राप्त माहितीनुसार सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात भोपाळ येथील एका कंपनी अंतर्गत रुगण्वाहिका चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनासह इतर मागण्यांना घेऊन २४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

अठरा दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी/डाकराम : मागील अठरा दिवसांपासून कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची चाके थांबली आहे. या आंदोलनाची अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे.
प्राप्त माहितीनुसार सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात भोपाळ येथील एका कंपनी अंतर्गत रुगण्वाहिका चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनासह इतर मागण्यांना घेऊन २४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी आठही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका सेवा ठप्प पडली आहे. त्यांच्या आंदोलनाला अठरा दिवसांचा कालावधी लोटूनही याची दखल आरोग्य व जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. परिणामी याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना सहन करावा लागत आहे.तिरोडा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
सुकडी/डाकराम, वडेगाव, मुंडीकोटा, इंदोरा बुजरुक या चार प्राथमिक केंद्रामध्ये प्रत्येकी १ रुग्णवाहिका आहे. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दोन रुग्णवाहीका आहेत. तर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक रुग्णवाहीका आहे. एकूण सात रुग्णवाहीका तिरोडा तालुक्यात आहे. रुग्णवाहिका चालकांच्या आंदोलनामुळे रुग्णवाहिका सेवा ठप्प पडली असून यासाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था आरोग्य विभागाने केली नाही. परिणामी रुग्णांना भरती करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंंड सहन करावा लागत आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात त्वरीत एखाद्या रुग्णाला दाखल करायचे असल्यास रुग्णवाहिका सेवा बंद असल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यानंतरही आरोग्य प्रशासन बिनधास्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संर्पक साधला असता तो होऊ शकला नाही.