योग्य व्यवस्थापनाअभावी पुजारीटोला धोक्यात
By Admin | Updated: November 13, 2014 23:04 IST2014-11-13T23:04:35+5:302014-11-13T23:04:35+5:30
जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील

योग्य व्यवस्थापनाअभावी पुजारीटोला धोक्यात
आमगाव : जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील निधी घश्यात जात असल्याने धरण परिसराची दुरवस्था होत आहे. धरण व परिसरातील हिरवळ पर्यटकांसाठी आकर्षण असताना आता त्याच जागेवर मद्यपी व जुगाऱ्यांनी कब्जा केल्याचे दिसून येते. त्यामुळे धरण व परिसर सद्यस्थितीत ओल्या पार्टीचे स्थळ म्हणून कुप्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यात सिंचन सुविधांसाठी कालीसराड, पुजारीटोला व शिरपूर धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शासनाने या धरणांचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. धरण परिसराच्या विकासासासाठी अनेक कामे या परिसरात करण्यात आली आहेत. धरण परिसर वनांनी वेढला असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य दिसून येतो. त्यामुळे धरण व या भागातील वनपरिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाते. यातूनच येथे पर्यटक नेहमी आकर्षित होत असतात. परंतु कालांतराने या धरण परिसरातील उपलब्ध सोयी जर्जर होत चालल्याने नागरिकही या भागाकडे पाठ दाखवित आहेत.
धरणाचे व परिसरातील व्यवस्थापनाची जबाबदारी बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाकडे आहे. शासन निधीअंतर्गत धरण परिसरात वास्तव्यात असलेल्या इमारती, वृक्षलागवड असलेला बगीचा यात भर घालण्यात आली. धरण परिसरात सौंदर्यीकरणाची भर पडावी यासाठी विविध पावले विभागाने उचलली आहेत. परंतु कालांतराने धरण व परिसर योग्य व्यवस्थापनाअभावी जर्जर होत चालला आहे. वास्तव्यासाठी उपयोगी असलेल्या इमारती, धरण परिसरातील दाराजवळील पूल, बगिचा पूर्णत: जर्जर अवस्थेत पोहोचला आहे. यात धरणावरील पुलावरील सुरक्षा भिंत, पुलावरील मोठी भेगा अपघातांना आमंत्रण देत आहेत. याकडे विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. धरणाच्या व्यवस्थापनाकरिता प्रशासनाने तत्पर असायला पाहिजे, परंतु धरण व परिसरातील जर्जर व्यवस्थेकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली आहे.
शासनाकडून दरवर्षी धरणाच्या व्यवस्थापनाकरिता निधी आवंटीत करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडे आहे. सदर निधीचा उपयोग होतच नसल्याचे धरण व परिसरातील वाताहत बघून लक्षात येते. धरण व परिसरातील वाताहतीमुळे पर्यटकांचा उद्देश सध्या मागे पडत आहे. या परिसरात विभागाच्या कामचुकारपणामुळे अवैध व्यवसायाला आता चालना मिळाली आहे.
या परिसरातील विश्रामगृहात जुगाराचे अड्डे तर मद्यपींची मैफल नेहमीचे वास्तव्य ठरले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी पाठ फिरविली आहे. धरण व परिसरात एकांतपणा असल्याने प्रेमीयुगलांसाठी मनोमिलनाचे स्थळ ठरले आहे. परिसरात वाढत्या अपराधिक वृत्तीमुळे परिसरात मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याची विभागाने कोणतीच दखल अद्याप घेतलेली नाही. या विभागाचा पूर्णत: नकारात्मक दृष्टीकोण असल्याने धरण व परिसरातील व्यवस्था पूर्ववत होत नसल्याचे दिसून येते.
(शहर प्रतिनिधी)