कुत्र्याने वाचविले अस्वलाच्या हल्ल्यातून मालकाचे प्राण, गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा येथील घटना
By अंकुश गुंडावार | Updated: February 27, 2025 21:49 IST2025-02-27T21:48:55+5:302025-02-27T21:49:21+5:30
Gondia News: अंगणात उभे असलेल्या मालकावर अस्वल अचानक हल्ला करते, अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मालकाची धडपड सुरू असते. मालक आरडाओरड करताच त्यांचा घरी पाळलेला कुत्रा मालकाच्या मदतीला धावून येतो आणि मालकाची सुटका करेपर्यंत अस्वलावर हल्ला करत राहतो, अशी थरारक घटना घडली आहे.

कुत्र्याने वाचविले अस्वलाच्या हल्ल्यातून मालकाचे प्राण, गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा येथील घटना
गोंदिया - अंगणात उभे असलेल्या मालकावर अस्वल अचानक हल्ला करते, अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मालकाची धडपड सुरू असते. मालक आरडाओरड करताच त्यांचा घरी पाळलेला कुत्रा मालकाच्या मदतीला धावून येतो. अस्वलावर हल्ला करून त्याच्या तावडीतून मालकाची सुटका करण्याचा प्रयत्न करतो, अस्वल मालकाला सोडेपर्यंत कुत्रा आपली झटपट सुरूच ठेवतो आणि अखेर अस्वलाच्या तावडीतून मालकाची सुटका करून अस्वलाचा पाठलाग करून त्याला जंगलाच्या दिशेने परतावून लावतो. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखीच घटना बुधवारी (दि.२६) रात्री गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा येथे घडली. राजेश हरिचंद चनाप असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मालकाचे नाव आहे.
गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा हे गाव नागझिरा अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास राजेश चनाप हे आपल्या अंगणात उभे होते. दरम्यान, अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या येथील कुत्र्याने अस्वलाच्या दिशेने धावत घेत त्याच्यासह झटापट करीत अस्वलाला जंगलाच्या दिशेने परतावून लावले. चनाप यांचा पाळीव कुत्रा वेळीच मालकाच्या मदतीला धावून आल्याने राजेश चनाप यांची अस्वलाच्या तावडीतून सुटका होऊन त्यांचे प्राण वाचले. दरम्यान, हा प्रकार चनाप यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच जखमी राजेश चनाप यांना उपचारार्थ गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठविला.
मुक्या जनावराची अशी ही माया
कुत्र्याला प्रामाणिक प्राणी म्हटले जाते. ते ज्याच्यावर जीव लावतात त्याचे जीव वाचविण्यासाठी आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. बोळूंदा येथील राजेश चनाप यांच्या घरी पाळलेल्या कुत्र्याच्या बाबतीत हे खरे ठरले. अस्वलाशी दोन हात करून त्यांच्या कुत्र्याने मालकाचे प्राण वाचविले. त्यामुळे त्यांच्या कुत्र्याचे कौतुक होत आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
बोळूंदा परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.