शौचालय नसल्यास रेशन देऊ नका

By Admin | Updated: August 28, 2016 00:56 IST2016-08-28T00:56:26+5:302016-08-28T00:56:26+5:30

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे शौचालय बांधणे बंधनकारक आहे.

Do not give ration if there is no toilet | शौचालय नसल्यास रेशन देऊ नका

शौचालय नसल्यास रेशन देऊ नका

जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला: जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा
गोंदिया : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे शौचालय बांधणे बंधनकारक आहे. महिला बचतगटांना १०० टक्के शौचालय असल्याशिवाय स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा पुरवठाच करु नका अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या सभेत दिल्या आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. स्वच्छता असेल तर समृध्दी नांदेल. कोणत्याही व्यक्तीने उघड्यावर शौचास बसू नये. प्रत्येकाने आपल्या घरी शौचालय बांधून रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा झाली. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजकुमार पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे उपस्थित होते. पुढे डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात पाणी मुबलक प्रमाणात आहे.
त्यामुळे शौचालय बांधण्यास अडचण नाही. कोल्हापूर व पालघर येथे शौचालय बांधण्याची योजना राबविण्यात आली. त्याच धर्तीवर या जिल्ह्यात जास्तीत जास्त शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावा. कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेला तर त्यांनी मुलांना प्रथम शौचालयाबाबत विचारावे. शाळेत हँडवॉश स्टेशन निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याच्या सवयी लावाव्यात.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वाहनाची नोंदणी करतांना त्यांच्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे. पोलीस विभागाने गुड मॉर्निंग पथकास सहकार्य करावे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय बांधले आहे काय याची खात्री करून घ्यावी. शौचालय बांधकामाला वेग येण्यासाठी ग्रामसेवकांच्या स्पर्धा निर्माण कराव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णांना शौचालयाचे महत्व व त्यामुळे होणाऱ्या आजाराची माहिती द्यावी.
जिल्ह्यातील माविमच्या महिला बचतगटातील ६० सहयोगीनींच्या स्पर्धा निर्माण करून ग्रामसभेच्या माध्यमातून शौचालय बांधकामाला वेग आणण्याचे काम करावे. महिला बचतगटांच्या ज्या सहयोगीनी शौचालय बांधण्याबाबत उत्कृष्ट काम करतील त्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. गवंड्यांची गावनिहाय यादी तयार करावी.
गोंदिया शहरातील मामा तलावाच्या शेजारी कोणीही शौचास बसू नये. जिल्ह्यात नविन तयार होणाऱ्या घरात वीज जोडणी देतांना शौचालयाची खात्री करून घ्यावी. ज्या घरात शौचालय नसेल त्या घरी नव्याने वीज जोडणी देवू नये, जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी शौचालय बांधलेच पाहिजे असा आग्रह डॉ.सूर्यवंशी यांनी केला.
सभेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जि.प.वरिष्ठ लेखा अधिकारी जवंजाळ, महाराष्ट्र जिवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक अनिल गुजे, सहायक पोलीस निरीक्षक वाबळे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिक्षक डी.एस.लोहबरे उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारीअधिकारी राजेश देशमुख यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Do not give ration if there is no toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.