जिल्हा अनलॉक, पण आठवडी बाजारासाठी ‘वेट ॲन्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:19+5:302021-06-18T04:21:19+5:30

गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आटोक्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ७ जूनपासून अनलॉक करण्यात आले. संचारबंदी, ...

District unlocked, but ‘Weight and Watch’ for the weekly market | जिल्हा अनलॉक, पण आठवडी बाजारासाठी ‘वेट ॲन्ड वॉच’

जिल्हा अनलॉक, पण आठवडी बाजारासाठी ‘वेट ॲन्ड वॉच’

Next

गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आटोक्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ७ जूनपासून अनलॉक करण्यात आले. संचारबंदी, जमावबंदीचा आदेशही काढण्यात आला; परंतु निघालेल्या संचारबंदीच्या आदेशात आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना नसल्याने जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही बंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही आदेश प्राप्त न झाल्याने बाजार सुरू करावा की नाही? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रशासनाने १५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबदी लागू केली होती. संचारबंदीच्या काळात आठवडी बाजार बंद करण्याचेही नमूद करण्यात आले होते. संसर्गाचा वेग मंदावल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी उठविण्यात आली. जमावबंदीचा आदेशही हटविण्यात आल्याने आठवडी बाजार सुरू होणे अपेक्षित होते.

......

ग्रामपंचायतच्या महसुलावर परिणाम

आठवडी बाजाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला महसूल प्राप्त होतो. परंतु निघालेल्या संचारबंदीच्या आदेशात जरी जमावबंदी हटविण्याचा आदेश असला तरी, त्या आदेशात आठवडी बाजार सुरू करण्याचा उल्लेख नसल्याने अनेक ग्रामपंचायत परिसरात आठवडी बाजार सुरू झाले नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

........

प्रशासनाने मागविले प्रस्ताव

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा कमी असून, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील १ टक्केच्या आतच आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी तहसीलदार आणि नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविल्याची माहिती आहे.

.........

संसर्गाच्या आनुषंगानेच विलंब

कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे आता ओसरली आहे. मात्र आठवडी बाजार म्हटले की त्यात ग्राहकांची गर्दी होते. तसेच अनलॉक झाल्यानंतर नागरिक बिनधास्तपणे वागू लागले आहेत. त्यामुळे आठवडी बाजार सुरू केले आणि ग्राहक आणि विक्रेत्यांकडून नियमांचे पालन केले गेले नाही तर संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने ‘वेट ॲन्ड वॉच’चे धोरण अवलंबिले आहे.

..........

नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन

जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली तरी ग्राहक आणि विक्रेत्यांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. अन्यथा कोरोनाचा पुन्हा शिरकाव होऊ शकतो.

...........

कोट

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मात्र आता संसर्ग आटोक्यात असल्याने आठवडी बाजार सुद्धा लवकरच सुरू केले जातील. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सुद्धा प्रस्ताव मागविले असून, येत्या तीन-चार दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

- विजय बोरुडे, तहसीलदार, देवरी

...............

Web Title: District unlocked, but ‘Weight and Watch’ for the weekly market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.