जिल्हा ग्राहक न्यायमंचचा टाटा मोटर्सला दणका

By Admin | Updated: August 15, 2015 01:46 IST2015-08-15T01:46:32+5:302015-08-15T01:46:32+5:30

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच इंजिन गरम होवून गाडी बंद पडत होती.

District customer judge of Tata Motors raid | जिल्हा ग्राहक न्यायमंचचा टाटा मोटर्सला दणका

जिल्हा ग्राहक न्यायमंचचा टाटा मोटर्सला दणका

उत्पादन दोष : एक लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश
गोंदिया : नवीन वाहन खरेदी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच इंजिन गरम होवून गाडी बंद पडत होती. वारंवार दुरूस्तीसाठी नेवूनही त्यातील दोष दूर होवू शकले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने टाटा मोटर्स कंपनीकडे वाहनात उत्पादन दोष असल्याचे सांगून नवीन वाहन देण्याची मागणी केली. मात्र मागणी फेटाळणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलात दणका देत वाहन बदलवून एक लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
सहाया आनंनधम क्रिष्णनम जॉन रा.अर्जुनी-मोरगाव असे तक्रारकर्तीचे नाव आहे. त्यांनी टाटा मोटर्स लि.च्या अधिकृत डिलर ए.के. गांधी कार नागपूर येथील टाटा व्हेंचर कार (एमएच ३५/पी-२१७८) चार लाख ६७ हजार ३८३ रूपयांना ८ जुलै २०११ रोजी विकत घेतली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यानंतर सदर वाहनाचे इंजिन अतिशय गरम होत होते व वाहन चालताना अचानक बंद पडत होते. त्यामुळे सहाया जॉन यांनी ती कार अर्जुनी-मोरगाववरून नागपूर येथील टाटा मोटर्सच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये नेले. त्यात सर्व दोष दूर करण्यात आल्याचे सांगून कार परत देण्यात आली. तसेच रिपेरिंग चार्ज म्हणून सहा हजार २५० रूपये घेण्यात आले.
परंतु पुन्हा तीन दिवसांनंतर कारमध्ये पूर्वीचीच इंजिन गरम होणे व कार बंद पडण्याची समस्या निर्माण झाली. अनुभवी यांत्रिक व अभियंते यांच्याकडून अनेक प्रयत्न करूनही दोष दूर होवू शकले नाही. निर्माण होणे व इंजिन वाहनाच अत्यावश्यक मूलभूत अंग असतो. सदर दोष पुन्हापुन्हा निर्माण होणे व दुरूस्त न होणे, तसेच इंजिन योग्यरित्या काम करीत नसल्यामुळे त्यात उत्पादन दोष असावा, असे दिसून आले. हे उत्पादन दोष तक्रारकर्तीने उत्तमरित्या जॉब कार्डमध्ये तसेच नोंदवून सिद्ध केले. परंतु विरूद्ध पक्ष उत्पादन दोष असल्याचे मानण्यास तयार नव्हते. तसेच त्यांच्या तज्ज्ञांनुसार दोष नसल्याचा आपला लिखित जबाब न्यायमंचात दाखल केला. परंतु कारमध्ये उत्पादन दोष नसल्याचे ते सिद्ध करू शकले नाही. मात्र तक्रारकर्ती व तिचे वकील अ‍ॅड. एस.बी. राजनकर यांनी ६ जून २०१४ व १६ जून २०१४ रोजी पाठविलेल्या नोटिसमध्ये कारच्या इंजिनमध्ये दोष असून अनेक प्रयत्न करूनही तो दूर होवू शकला नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे टाटा मोटर्स त्याच कारचा सारखाच नवीन मॉडेल देण्यासाठी व नोंदणीसुद्धा करून देण्यासाठी पात्र आहे, असे न्यायमंचाचे मत झाले.
जिल्हा तक्रार ग्राहक निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी प्रकरणाची कारणमिमांसा केली व सहाया जॉन यांची तक्रार मान्य केली. तसेच कारमध्ये उत्पादन दोष असून तो दोष दूर होणार नसल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीने तक्रारकर्तीस नवीन गाडी बदलून द्यावे, नुकसान भरपाई म्हणून एक लाख रूपये द्यावे व तक्रारीच्या खर्चापोटी दहा हजार रूपये द्यावे तसेच सदर आदेशाचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला. (प्रतिनिधी)

Web Title: District customer judge of Tata Motors raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.