चौदा वर्ष काम करूनही विमानतळ प्रशासनाने कामावरून काढल्याने विशाल सुरक्षारक्षक कामगार संघटनेच्या नेतृत्वात पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी १९ जानेवारीपासून बिरसी विमानतळ परिसरात आंदोलन सुरू केले आहे. चौदा वर्षांपासून रखडलेले पुनर्वसन त्वरित करण्यात यावे. सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाला आमदार विनोद अग्रवाल, विमानतळ व्यस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे व जिल्ह्यातील विविध संघटनाना व पद्धधिकाऱ्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच खासदार सुनील मेंढे यांनीही आंदोलनकर्त्यांचे प्रश्न दिल्ली दरबारात उचलून त्वरित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र मागील पंधरा दिवसांपासून यावर कसलाच तोडगा काढण्यात आला नाही. मध्यंतरी आंदोलनकर्त्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनात अनेक आंदोलकांची प्रकृती बिघडली होती. दरम्यान, बुधवारपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच कडाक्याची थंडी, अशा बिकट परिस्थितीत ही आंदोलनकर्ते आपल्या कुटुंबीयासह आंदोलन सुरूच ठेवले आहे. जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्रशासनाने याची दखल घेऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
भर पावसातही बिरसीवासीयांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:55 IST