अनुदानाच्या रकमेपासून वंचित
By Admin | Updated: January 25, 2015 23:16 IST2015-01-25T23:16:35+5:302015-01-25T23:16:35+5:30
घरगुती गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) अपयशी तर ठरणार नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

अनुदानाच्या रकमेपासून वंचित
घरगुती गॅस ग्राहक त्रस्त : सर्व्हर फेल झाल्याने नुकसान
गोंदिया : घरगुती गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) अपयशी तर ठरणार नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. मागील २५ दिवसांपासून अनेक ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा न झाल्याने या प्रकाराला आता बळ मिळत आहे.
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) पुन्हा एकदा सुरू केल्यानंतर यात अनेक अडचणी येत आहेत. देवरी येथे २० दिवसांपूर्वी ज्यांनी गॅससाठी रक्कम देवून सिलेंडर घेतले, त्यांच्या बँक खात्यात अद्यापही अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. अनेक गॅस ग्राहकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा शासनाचा अन्याय असून अशा पद्धतीने रक्कम दिल्यावर त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी, असे या ग्राहकांचे म्हणणे आहे.
गॅसची देय रक्कम भरल्यावर त्याच दिवशी ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी, असा नियमसुद्धा आहे. देवरी येथील एच.पी. गॅस देवरी फ्लैम्सच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर तेथे कार्यरत विशाल नामक कर्मचाऱ्याने सांगितले की, मागील २० दिवसांपासून ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही, हे सत्य आहे. ही बाब संगणकावर उपलब्ध नेटवर आॅप्शन बघितल्यावर माहीती झाली. आता अनुदानाच्या रकमेसाठी तिकीट लॉक करावे लागेल किंवा आॅनलाईन संदेश पाठविणे आवश्यक आहे, ही बाब आज माहीती झाली आहे.
मात्र आता ज्यांच्या अनुदानाची रक्कम थांबलेली आहे त्यांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, ग्राहकांच्या बँक खात्यात पाच-सहा दिवसांतच अनुदानाची रक्कम जमा होणे गरजेचे आहे. परंतु जर सर्व्हर फेल झाले असेल किंवा बँक खाते क्रमांक चुकीचे असेल तर या कालावधीत अनुदान जमा होवू शकणार नाही. जर २० दिवस लोटूनही अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर याचा अर्थ सर्व्हर फेल झाले असेल, असा होतो.
असे झाल्यास १५ दिवसांच्या नंतरच सदर रक्कम बँक खात्यात जमा होवू शकेल. त्यासाठी विलंब झाल्याच्या परिस्थितीत ग्राहकांना २० ते २५ दिवस वाट पहावी लागेल. (प्रतिनिधी)