नवेगावबांध येथे संचारबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:11+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे.

Curfew at Navegaonbandh | नवेगावबांध येथे संचारबंदीचा फज्जा

नवेगावबांध येथे संचारबंदीचा फज्जा

Next
ठळक मुद्देना मास्क, ना शारीरिक अंत, प्रशासन कुंभकर्णी झोपेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : जिल्हा प्रशासनाने शिथील केलेल्या अटींचा गैरफायदा नागरिक घेत असून मास्क न वापरता अनेकजण खुलेआम फिरत आहेत. शारीरिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरूवारी (ता.२१) जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. यातील बहुतांश रूग्ण अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील असल्याचे समजते. हे सर्व रूग्ण मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतून आले आहेत. असे असताना गावातील स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे. मोबाईल, किराणा, कापड, देशी दारूचे दुकान, जनरल स्टोअर्स, स्वस्त धान्य दुकान, पान व पहाच्या टपऱ्या जवळपास सर्वच बाजारपेठ खुल्लमखुल्ला सुरू आहे.
गुरूवारी (ता.२१) सायंकाळी आझाद चौकात भररस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान व हातठेले यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कोरोनाचा आणखी धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तालुका प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
नाका-तोंडाला मास्क किंवा रूमाल न बांधणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तरूणाई तर दुचाकीवर कधी दोघे, तर कधी तिघे बसवून फिरत नियम धाब्यावर टाकत आहे. परंतु कारवाईसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पोलीस विभाग ग्रामपंचायतकडे तर, ग्रामपंचायत महसूल विभागाकडे बोट दाखवतो. यांच्यात समन्वयाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती फक्त कागदावरच उरली आहे.

Web Title: Curfew at Navegaonbandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.