गोंदिया - जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. अशा कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करुन त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची ओरड वाढली आहे. याचीच दखल घेत कलेक्टर, सीईओ, डीएचओ यांनी शुक्रवारी (दि.९) सकाळीच थेट शहरातील मेडिकल दुकानांमध्ये धडक देत रेमडेसिविरचा स्टॉक चेक केला. तसेच मेडिकलची पाहणी केली अचानक दिलेल्या भेटीमुळे मेडिकल चालकांमध्ये खळबळ उडाली होती. गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा काही मेडिकल चालक घेत असून तुडवडा निर्माण करुन अतिरिक्त दाराने त्याची विक्री करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरातील जे स्टाॅकिस्ट आहेत त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, त्याची माहिती वेळोवेळी प्रशासनाला द्यावी यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कुठलीही पूर्वसूचना थेट शहरातील मेडिकल दुकानांना भेट देऊन रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोना संबंधित औषधांचा साठा किती उपलब्ध आहे याची तपासणी केली. तसेच अतिरिक्त स्टॉक उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देत अतिरिक्त दराने रेमडेसिविर व इतर औषधांची विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.जिल्हाधिकाऱ्यांनी दोन मेडिकलच्या दुकानातील संगणकातील स्टॉकची सुध्दा पाहणी केली. दरम्यान या धडक मोहिमेमुळे मेडिकल चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, डीएचओ डॉ. नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी सुध्दा उपस्थितीत होते. अतिरिक्त दराने विक्री केल्यास थेट तक्रारी करा रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी संपूर्ण राज्यभरातच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करुन लूट केली जात आहे. यासंबंधिच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा रेमडेसिविर इंजेक्शन, मास्क यांची अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्यांची थेट माझ्याकडे तक्रार असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी नागरिकांना आवाहन केले. कारोना संसर्गात वेगाने वाढ होत आहे. यामुळे रेमडेसिविर कोरोनावरील औषधांची मागणी वाढली आहे. पण या संधीचा फायदा घेत औषधांचा काळाबाजार केला जात आहे. मात्र हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून काळाबाजार करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही,त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. - दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी
रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ग्राऊंडवर, मेडिकलला भेट देऊन तपासला डाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 14:48 IST