फटाक्यांच्या विक्रीत यावर्षी घट !
By Admin | Updated: October 18, 2014 23:28 IST2014-10-18T23:28:52+5:302014-10-18T23:28:52+5:30
दिवाळी हा सण भारतवासीयांचा सर्वाधिक महत्त्वाचा सण समजला जातो. दिवाळीपूर्वी नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून उत्सव साजरा करतात. तेलाच्या दिव्यांपासून रोषणाई व

फटाक्यांच्या विक्रीत यावर्षी घट !
गोंदिया : दिवाळी हा सण भारतवासीयांचा सर्वाधिक महत्त्वाचा सण समजला जातो. दिवाळीपूर्वी नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून उत्सव साजरा करतात. तेलाच्या दिव्यांपासून रोषणाई व आकाशदिवेही लावले जातात. परंतु फटाके फोडल्याशिवाय दिवाळीचा आनंदोत्सव साजराच होत नाही, अशी धारणा लोकांमध्ये रुढ झाली आहे. असे असले तरी यावर्षी फटाक्यांना काही प्रमाणात आवर घातल्या गेला आहे. फटाक्यांच्या वाढलेल्या किमती आणि प्रदूषण अशा दोन्ही बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
याबाबत ‘लोकमत’ने कानोसा घेतला असता दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच प्रमाणात महागाईची झळ सहन करावी लागल्याचे दिसून आले. यातूनच फटाक्यांची विक्री दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे फटाके व्यावसायिकांनी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात आधी पावसाच्या थैमानाने अनेकांची घरे, गोठे धराशायी झाले. धानपीक तर पाण्यात बुडाले. काही पीक अतिवृष्टीच्या पावसात वाहून गेले. उर्वरित पिकांवर रोगांनी हल्ला चढविला.
यंदा दरवर्षीच्या तुलनेत पिकांचे उत्पन्न कमी आहे. त्यातच शासकीय धान खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे दिवाळीसारखा सण यंदा नागरिकांना उत्साहाने साजरा करता आला नाही. याचा परिणाम फटाके व्यायसायिकांवर होवून फटाक्यांची विक्री कमी झाल्याचे गोंदियातील फटाका व्यावसायिक बेनिमाधव चौरसिया व संजय चौरसिया यांनी सांगितले.
शहरात सहा ते सात फटाके विक्रीचे ठोक व्यावसायिक आहे. याशिवाय जवळपास १०० किरकोळ विक्रेते आहेत. यंदा नागरिकांनी कमी आवाजाच्या व स्वस्त दराच्या फटाक्यांना पसंती दर्शवून ते खरेदी केले. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान न होता ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याची नागरिकांची भावना दृढ होत असल्याचे दिसून आले.
अनार, फुलझडी, चक्री, लुझबॉम्ब, टिकल्या, आगपेटी, फॅन्सी फटाके आदी अत्यंत कमी आवाजाचे फटाके यंदा अधिक प्रमाणात विक्री झाले.
याशिवाय बाजारात सुतळी बाँब, लक्ष्मी बाँब, रॅकेट, एकापाठोपाठ सात ते ३० आवाज होणारे फटाके उपलब्ध होते. मात्र ते कमी प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.