जनजागृती, मास्क निर्मिती आणि उद्योगाला हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:16+5:30
देशातून कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सवार्धिक रूग्ण असल्याने राज्य शासनही लढा देत आहे. अशात माविमच्या बचतगटातील महिलांंनी सुद्धा आपली कंबर कसली असून शासनाच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी सरसावल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी माविमच्या बचतगटातील महिला गावोगावी पोस्टर्सवर संदेश लिहून जनजागृती करीत आहे.

जनजागृती, मास्क निर्मिती आणि उद्योगाला हातभार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन ग्रामीण आणि शहरी भागातील बचतगटांच्या महिला कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी उतरल्या आहेत. माविमच्या या महिला गावोगावी पोस्टर्सच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनजागृतीचा संदेश देत आहे. तसेच कापडी मास्कची निर्मिती करीत आहे. एवढेच नव्हे तर बँक करस्पाँडंट या नात्याने देखील काम करीत आहे.
देशातून कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सवार्धिक रूग्ण असल्याने राज्य शासनही लढा देत आहे. अशात माविमच्या बचतगटातील महिलांंनी सुद्धा आपली कंबर कसली असून शासनाच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी सरसावल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी माविमच्या बचतगटातील महिला गावोगावी पोस्टर्सवर संदेश लिहून जनजागृती करीत आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असून लोक दक्षता घेऊ लागले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील माविमच्या सहा हजार २८ बचतगटांतील हजारो महिलांनी या कार्यात भाग घेतला आहे.
विशेष म्हणजे, या महिला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाक आणि तोंड झाकण्यासाठी वापरण्यात येणारे कापडी मास्क तयार करून विक्रीही करीत आहेत. येथील उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या कापडी पिशवी उद्योग निर्मिती केंद्रात ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या महिला आधुनिक शिलाई मशीनवर कापडी मास्क तयार करीत आहे. आतापर्यंत या महिलांनी २१ हजार ६०० मास्क तयार करून त्याची विक्री केली आहे.
मास्क निर्मितीतून या महिलांना रोजगाराचे एक साधन उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मास्क निर्मिती करून महिलांनी आपले योगदान दिले आहे.
बँकेचे सेवक म्हणून देत आहेत सेवा
गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर ठेवणे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग आहे. अशात मात्र अनेक योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक आहे अशा लाभार्थ्यांना माविमच्या ५२ महिला बँक करस्पॉडंटची भूमिका निभावून त्यांच्याजवळ असलेल्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून घरबसल्या रक्कम मिळवून देत आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांची बँकेतून पैसे काढण्यासाठी होणारी पायपीट तर थांबली आहेच सोबतच कोरोना विषाणूच्या संसर्गापासून विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा बचाव करण्यास मदत होत आहे.