लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एकीकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असताना दुसरीकडे चांगल्या प्रतिच्या दुधालादेखील योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने दुधाला हमी भाव द्यावा, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.
जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून जवळपास सर्वच शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करतात. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर चालतो. यासोबच दुधापासून बनविण्यात येणारा खवा, पेढा यासारख्या पदार्थांची निर्मितीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते. यामुळेच जिल्ह्यात सद्यःस्थितीत ४० हजारांवर दुभती जनावरे असून, या माध्यमातून शासकीय आकडेवारीनुसार दररोज दोन लाख लिटर दुधाचे संकलन होते. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने दूध संकलन चांगले आहे.
दरम्यान, खासगी व्यापारी केवळ २० रुपये लिटर दूध खरेदी करीत असून, त्याची मात्र ६० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे खासगी दूध केंद्र चालवणारे मालामाल होत असले तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर दूग्ध व्यवसाय करावा लागत असल्याचे दिसते. वास्तविक दुग्ध व्यवसाय करताना पशुधनाची जोपासना हा मुख्य भाग आहे.
खुराकची किंमत वाढते; मग दुधाची का नाही? जनावरांचा खुराक, औषधोपचार, वैराण, गवत यासाठी शेतकऱ्यांना रोख पैसे मोजावे लागतात. त्यातच पशुखाद्य, खुराकचे दर तीन-चार महिन्यांत वाढतात. मात्र दुधाची किंमत 'जैसे थे' असते.
व्यावसायिकांचे जाळे वाढले जिल्ह्यात दूध मोठ्या प्रमाणात होते. परंतु मागील काळात प्रशासनाची शासकीय दूध योजना बंद पडली होती. पर्यायाने व्यावसाकांचे जाळे वाढताना दिसत आहे. शेतमालासोबत दुधालाही सरकारने हमी भाव जाहीर करावा, ही मागणी आजही प्रलंबित आहे.
"दिवसेंदिवस हवामानाचा समतोल ढासळतोय त्यामुळे शेतीतून तोडके उत्पन्न हाती येते. अशात जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करावा लागतोय. परंतु दुग्धव्यवसायाचा खर्चही वाढत असून, त्या प्रमाणात दर मिळत नाही. सरकारने दुधाला ६० रुपये हमीभाव जाहीर केला तरच दुग्ध व्यवसायातून प्रगती होईल, अन्यथा दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल." - अशोक गायधने, पशुपालक, शिवणी
"मी मागील २० वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करतो. माझ्याकडे सध्या १० दुभती जनावरे आहेत. मात्र, दुग्ध व्यवसायाचा खर्च पाहता दुधाला शासनाकडून मिळणारा २५ रुपये दर खूपच तोकडा आहे. त्यामुळे सरकारने दुधाला कमीत कमी ६० रुपये प्रतिलिटर हमी भाव जाहीर केला तरच भविष्यात दुग्ध व्यवसाय टिकेल."- शंकर मेंढे, पशुपालक, शिवणी