गुटखाबंदीसाठी समित्यांचा सहभाग आवश्यक
By Admin | Updated: October 16, 2014 23:27 IST2014-10-16T23:27:56+5:302014-10-16T23:27:56+5:30
केवळ तंटे मिटविणे हा तंटामुक्त समित्यांचा उद्देश नसून, संपूर्ण अभियान राबविताना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे हे देखील महत्वाचे भाग आहे. शासनाने एकूण १० प्रकार निश्चित केलेत.

गुटखाबंदीसाठी समित्यांचा सहभाग आवश्यक
अर्जुनी/मोरगाव : केवळ तंटे मिटविणे हा तंटामुक्त समित्यांचा उद्देश नसून, संपूर्ण अभियान राबविताना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे हे देखील महत्वाचे भाग आहे. शासनाने एकूण १० प्रकार निश्चित केलेत. त्यामध्ये व्यसनमुक्तीला प्राधान्य दिले आहे. गावातील दारुधंद्याबरोबर १०० टक्के गुटखाबंदी करणे गरजेचे आहे. गावपातळीवर तंटामुक्त समित्यांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्यााचे मत तंटामुक्त समित्यांच्या संघाने व्यक्त केले.
राज्यात गुटखाबंदी असली तरी चोरट्या मार्गाने तो मिळतोच. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत तंबाखू किंवा गुटखा सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
अगदी १५ ते १६ वर्षांच्या युवकांपासून ५० ते ५५ वयोगटातील मंडळी गुटखा सेवन करतात. शासनाला गुटख्यामुळे सुमारे १०० कोटींच्या महसूल प्राप्त होत होता. परंतु, सार्वजनिक आरोग्याच्या हितार्थ महसुलावर पाणी सोडून गुटखाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. अन्न व औषध प्रशासनाकडून देखील लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करुन जाळून नष्ट करण्यात आला. शासकीय पातळीवर गुटखाबंदी मोठ्या प्रमाणात सुरु असताना छुप्या पद्धतीने किंवा चोरुन गुटखा विक्री करण्यात येते.
दिवसाला पाच पंचवीस गुटख्याच्या पुड्या सेवन करणाऱ्यांना गुटखा सेवनाशिवाय जगणे मुश्कील होऊ लागले. त्यामुळे सेवन करणाऱ्यांची मागणी लक्षात घेता चोरीने, छुप्या पद्धतीने विक्री होऊ लागली. ठरावीक ग्राहक टोपण नावाने गुटख्याची मागणी करतात. नियमित ग्राहक ओळखून त्याची विक्री करण्यात येते. शासनाकडून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबविताना त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु ती होत नाही हीच खरी शोकांतिका असल्याचा सूर या संघाने व्यक्त केला आहे.
गावोगावाच्या तंटामुक्त समित्यांनी चोरीने किंवा छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांना पकडून विक्री बंद करणे गरजेचे आहे. जेणेकरुन भावी युवा पिढीचे भवितव्य सुरक्षित राहील. काही पैशासाठी दुकानदार गुटख्यासारख्या तत्सम वस्तूंची विक्री करतात. जेणेकरुन युवकांचे-तरुणांचे आरोग्य धोक्यात येते. त्यापेक्षा संबंधित दुकानदारांना तंटामुक्त समित्यांनी योग्य मार्गदर्शन केले तर तेही व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. याशिवाय गावामध्ये आरोग्याशी निगडित वैद्यकीय अधिकारी किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन करुन प्रबोधन करण्याची तितकीच गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)