विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून लाटतात कमिशन
By Admin | Updated: September 2, 2016 01:39 IST2016-09-02T01:39:47+5:302016-09-02T01:39:47+5:30
शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून लाटतात कमिशन
अनेक मालामाल : एजन्सीसह कर्मचाऱ्यांचाही सहभाग
आमगाव : शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत तेथे महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात तांदूळ व डाळ शिल्लक राहतो. तिच्यावर संबंधित कर्मचारी व एजंसी डल्ला मारताना दिसत आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रकार सुरू आहे.
गाडीत आलेला व उरलेला पोषण आहार, वाटप करणारी एजंसीच विक्री करते. यात एजंसी, मुख्याध्यापक तथा जबाबदारी असणारे शिक्षक आणि केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी तसेच आणखीही काही अधिकारी सहभागी असल्याची कुजबूज सुरू आहे. या सर्वांना शालेय पोषण आहारात किती गोलमाल आहे याची संपूर्ण माहिती असते. मात्र धनिरामच्या लालचेपोटी कोणी यात काय गौडबंगाल आहे यावर भाष्य करीत नाही. ही परंपरा सर्वच शाळेत सुरू आहे. जिल्हा परिषदस्तरावर समिती गठीत करुन वाटपानंतर व उपयोगात पोषण आहार आल्यानंतर किती साठा शाळेत उपलब्ध आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे.
नियमानुसार एका विद्यार्थ्यांमागे एका दिवसाला किती तांदुळ, दाळ, तेल व इतर सामान देणे आहे हा ठरविलेला कार्यक्रम आहे. प्रत्यक्षात नियमाने शालेय पोषण आहार शिजविला जात नाही. काही विद्यार्थी पोषण आहार घेत नाही. काहीची अनुपस्थिती असते व प्रमाणात पोषण आहार शिजविला जात नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो. शिल्लक पोषण आहारावरच सर्वाचा डोळा असतो. काही शाळेत पोषण आहारावरुन शिक्षक व मुख्याध्यापक यांचे भांडण झाल्याचे अनेक उदाहरण आहेत.
खाजगी शाळेत मुख्याध्यापक हाच सर्वेसर्वा असल्याने तो कोणाला विकतो, कसा खातो हे काही कर्मचाऱ्यांना माहित असूनही ते बोलत नाही. मात्र केंद्रप्रमुख याचा शालेय पोषण आहाराचा महिना मुख्याध्यापकाकडून किती घ्यायचा हा ठरलेला असतो. याच उरलेल्या पोषण आहारावर अनेक मालामाल झाले. तसेच वाटप करणाऱ्या एजंसीचे वारेनारे झाले. ही वाटप पद्धती बदलविणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)