ढगाळ वातावरणामुळे विविध पिके प्रभावित
By Admin | Updated: October 27, 2014 22:37 IST2014-10-27T22:37:34+5:302014-10-27T22:37:34+5:30
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही

ढगाळ वातावरणामुळे विविध पिके प्रभावित
गोंदिया : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही धोका उद्भवू शकतो, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले आहे.
यंदा सुरूवातीपासूनच पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. आता हलका धान कापणीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली असून धान शेतात ठेवला आहे. ढगाळ वातावरणात पाऊस कधीही पडल्यास धानाला नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका पुन्हा शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हलक्या धानाची कापणी केली नाही, त्या पिकावर सावरदेवी नामक रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यात धानाचे लोंब गळून पडते व त्यामुळे उत्पादनात घट होते. शिवाय कापलेले धान पाऊस आल्यास भिजून खराब होण्याची शक्यता आहे. भारी धानपीक परिपक्वतेत असून दाने भरण्यासाठी त्यांना उन्हाची गरज आहे. परंतु ढगाळ वातावरण त्यांना बाधक ठरत आहे. यामुळे शेतकरी पेचात सापडला आहे.
डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीचे पीक प्रमुख समजले जाते. परंतु काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे तुर पीक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर अळी लागून फुले व कळ्या पोखरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बागायती पिकांमध्ये कांदा हा जमिनीतच सडण्याची शक्यता आहे. टमाटर व केळीसारखी पिकेही किरकोळ प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. भेंड्यांवर अळींनी आक्रमण केले असून मोठ्या संख्येत भेंड्या पोखरल्या गेल्या आहेत. त्यांच्याही उत्पादनात घटच होईल. एकंदरीत हे ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे. शेतकऱ्यांनी आपले विविध प्रकारचे पीक वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषधांची फवारणी केल्यास किडींचा तातडीने नायनाट करता येईल व पिके वाचविता येतील. यासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे वाटप करण्यात आले. पिकांबाबत उद्भवणाऱ्या समस्यांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, कृषी अधिकारी, सहायक व कृषिमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)