दारूच्या बाटल्यांवर ब्रेड-बिस्कीटची सोय
By Admin | Updated: November 1, 2014 23:10 IST2014-11-01T23:10:18+5:302014-11-01T23:10:18+5:30
दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही.

दारूच्या बाटल्यांवर ब्रेड-बिस्कीटची सोय
गोंदिया : दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही. त्यांना वडिलांनी ढोसलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या विकूनच आपल्या ब्रेड-बिस्कीटची सोय करावी लागत आहे.
सकाळी चहासोबत ब्रेड-बिस्कीट देण्याची ऐपत नसलेल्या वडिलांची मुले बापाने फस्त केलेल्या दारूच्या बाटलीवर ब्रेड-बिस्कीट खरेदी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक घरांत सकाळीच ‘बाबा’ दारूचा पव्वा कुठे आहे, हा स्वर कानी पडतो. मुलाला १ रुपयाचे ब्रेड खरेदी करून देण्याची ऐपत नसलेला पिता मात्र रोज ३५ ते ४० रुपयांची दारू ढोसतो. हे विदारक चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते.
महाराष्ट्र शासन तंटामुक्तीच्या माध्यमाने गावात दारूबंदी करण्यास प्रोत्साहन करते. एकीकडे शासनच दारू परवाने, दारू काढण्यास, विक्री करण्यास प्रोत्साहन करते. शासनच नियम धाब्यावर बसवते. सरकार स्वतच्या स्वार्थासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची ऐशीतैशी करते. महात्मा गांधी तंटामुक्त एकही गावात दारूबंदी नाही. फक्त कागदावरच नावाचा उदोउदो करण्यासाठी पोलिस खोटा अहवाल सादर करण्यास बाध्य करतात. या कालावधीत अनेक घटना घडून गेल्या. दारूबंदीची पुरती वाट लागली आहे. रोजगाराअभावी दारूविक्री करून उदरभरण करणारा स्वतंत्र वर्ग समाजात निर्माण झाला आहे. पाण्याचा पैसा कमविणारे समाजात प्रतिष्ठित म्हणून पुढे आले आहेत. जिल्ह्यात रोजगाराचे साधन नाही. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. हातावर आणून पानावर खाणारेही कमी नाहीत.
दिवसभरातील कामाचा क्षण घालविण्यासाठी दारूचा घोट पोटात रिचविल्या जाते. दिवसभर अंगमेहनत करून ६० ते ७०रुपये मजुरी हाती पडते. ही मजुरी मिळविण्यासाठी दिवसभर काम करावे लागते. त्या कामाचा क्षण घालविण्यासाठी कामावलेले अर्ध्यापेक्षा जास्त रुपये खर्च होतात. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी ओढाताण सहन करावी लागते. फाटक्या शर्टाने, विनाचपलांनी हातात पुस्तक घेऊन मुलगा शाळेत जातो. पोटात दोन वेळचे अन्न मिळत नाही. तरीही वडील दारू पितात. वडिलांकडे पैशाची मागणी केली तर पाठीवर थपाटा मिळेल, ही भीती त्यांना असते.