आई रागावल्याने ‘तिने’ केला सायकलने १८० किमी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:06 IST2018-09-29T12:03:16+5:302018-09-29T12:06:15+5:30
खर्रा खाताना एका १५ वर्षीय बालिकेला तिच्या आईने प्रत्यक्ष पाहिले. यात आईने त्या बालिकेला रागावून कानशिलात मारले. रागाच्याभरात या बालिकेने तब्बल नागपूर ते अड्याळजवळील नेरला येथे १८० किमीचा प्रवास सायकलने गाठला.

आई रागावल्याने ‘तिने’ केला सायकलने १८० किमी प्रवास
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खर्रा खाताना एका १५ वर्षीय बालिकेला तिच्या आईने प्रत्यक्ष पाहिले. यात आईने त्या बालिकेला रागावून कानशिलात मारले. रागाच्याभरात या बालिकेने तब्बल नागपूर ते अड्याळजवळील नेरला येथे १८० किमीचा प्रवास सायकलने गाठला. सुदैवाने अड्याळ पोलिसांच्या तत्परतेमुळे सदर बालिका पालकांच्या स्वाधीन करण्यात आली.
सीमा (काल्पनिक नाव) ही पंधरा वर्षीय मुलगी नागपूर शहरानजीकच्या सोनेगाव परिसरात वास्तव्यास आहे. दोन दिवसांपुर्वीच म्हणजे मंगळवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास सीमा ही तंबाखुचा खर्रा खात होती. ही बाब तिच्या आईने बघीतली. तंबाखु खात असल्याचे बघताच आईने सीमाला रागावले तसेच तिच्या थोबाडीत मारली. क्षणाचाही विचार न करता जवळपास सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सिमाने तिच्या जवळील सायकल घेवून घराबाहेर पडली. सीमा ही सोनेगाव येथून भिवापूर-उमरेड मार्गावर आली. उमरेड मार्गे ती पवनी शहरात दाखल झाली. पवनी येथून निघून ती अड्याळ व त्यानंतर नेरला फाट्यापर्यंत पोहोचली. यावेळी रात्रीचे ८.३० वाजले होते. जवळपास १२ तास अविरतपणे सिमा ही सायकल चालवून तिथपर्यंत पोहोचली होती. प्रचंड थकल्याने ती खाली कोसळली. येणाऱ्या जाणाºयानी विचारपूस करण्याचे साहस केले नाही. याच दरम्यान अड्याळ येथील पोष्टमन सुधिर वाघाये तिथून जात असताना त्यांनी सिमाची विचारपूस केली. घडलेला वृत्तांत सिमाने वाघाये यांना सांगितला. क्षणाचाही विलंब न करता वाघाये यांनी याची माहिती अड्याळ पोलीस ठाण्यात देत तिला आपल्यासोबत अड्याळ ठाण्यात नेले.
अड्याळ पोलिसांनीही विलंब न लावता मुलीला विश्वासात घेत तिच्याकडून पालकांची माहिती जाणुन घेतली. तसेच तिच्या कुटूंबीयाला सिमा अड्याळ पोलीस ठाण्यात असून सुखरुप असल्याचे भ्रमणध्वनीवरुन सांगितले.
पहाटेला पोहचले आई-बाबा
सीमा अड्याळ पोलीस ठाण्यात सुखरुप असल्याचे कळताच सीमाच्या आई-वडीलांनी भंडारा जिल्ह्याची वाट धरली. मध्यरात्रीच्या सुमारास ते भंडारा येथे पोहोचले. भंडारा येथे वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई प्रकाश थोटे हे कर्तव्यावर असतांना सीमाच्या आईवडिलांशी भेट झाली. थोटे यांनी तात्काळ अड्याळ पोलिसांशी संपर्क करुन ते भंडारा येथे पोहोचल्याचे सांगितले. त्या दोघांना भंडारा टोलनाक्यापर्यंत पोहचवून अड्याळ येथे जाण्याचा मार्ग दाखविला. पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सीमा व तिच्या आई वडीलांची भेट घडून आली. रागाच्या भरात केलेल्या कृत्यात आई-बाबांचा जीव कासावीस झाला असतांना सीमा बघून त्यांना अतोनात आनंद झाला. याबाबत मात्र अड्याळ पोलिसांची भूमिका कौतुकास्पद ठरली.