गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 06:15 PM2022-03-14T18:15:10+5:302022-03-14T18:21:20+5:30

बंदुकीच्या गोळीने अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

bear hunting by poachers in gondia forest | गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ

गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ

Next
ठळक मुद्देचान्ना बिटमधील घटनाशिकाऱ्यांचा शोध सुरू 

नवेगाव बांध (गोंदिया) : बंदुकीने गोळी झाडून अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना नवेगाव बांध अंतर्गत सहवनक्षेत्र बाराभाटी चान्ना बिट, इंजोरी परिसरात रविवारी (दि. १३) उघडकीस आली. मांसासाठी शिकार केल्याची माहिती आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बिटअंतर्गत येणाऱ्या इंजोरी येथील शेतकरी होमराज धनीराम शेंडे त्यांच्या शेतात अस्वलाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहितीच्या आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी शेतात जाऊन मोका तपासणी केली. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून अस्वलाचे शवविच्छेदन केले.

शवविच्छेदन अहवालात अस्वलाची शिकार ही बंदुकीची गोळी झाडून केल्याची बाब पुढे आली. घटना स्थळावर अस्वलाचे पंजे, कातडे व मांस आढळले. याप्रकरणी अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,४४,४८, अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. नवेगाव बांध वनपरिक्षेत्रात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार वीज प्रवाहाने केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर बंदुकीच्या गोळीने अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी डी. व्ही. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आय. दोनोडे करीत आहेत.

शिकाऱ्यांचा शोध सुरू

नवेगाव बांध वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चान्ना बिटात अस्वलाची बंदुकीने गोळी झाडून शिकार करण्यात आल्याची घटना पुढे आली. यामुळे या परिसरात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. या शिकाऱ्यांचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.

Web Title: bear hunting by poachers in gondia forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.