गोंदियात लाचेची मागणी करताना सहायक निबंधक अडकला; एक लाख रुपयांची केली होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:09 IST2025-10-29T14:08:39+5:302025-10-29T14:09:15+5:30
Gondia : मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द केल्याने त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून २२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा सहायक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

Assistant registrar caught demanding bribe in Gondia; Demanded Rs 1 lakh
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द केल्याने त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून २२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा सहायक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई गोंदिया येथे मंगळवारी (दि. २८) नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) केली. सुदाम लक्ष्मण रोकडे असे लाचेची मागणी करणाऱ्या सहायक निबंधकाचे नाव आहे.
तक्रारदाराचा मासेमारी व्यवसाय आहे. त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या., रामनगर रजि. नं. ६६८ या संस्थेसोबत उत्पादित मासे खरेदी-विक्रीचा करारनामा केला. हा करारनामा कालावधी सन २०२३ ते २०२७ दरम्यानचा आहे. काही कारणास्तव संस्थेने त्यांचा करारनामा मुदतपूर्व रद्द केला. याबाबत तक्रारदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य भंडारा यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवर चौकशी करण्याकरिता सहायक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे (वय ५६) सहकारी संस्था गोंदिया तथा अतिरिक्त प्रभार सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य) भंडारा याने तक्रारदाराला यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली.
मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार एसीबीकडे केली. या लाचमागणीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने ९ ऑक्टोबर २०१६ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या सापळा पडताळणी दरम्यान सुदाम रोकडे यांनी तक्रारीची चौकशी करण्याकरिता तक्रारदाराला एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता २५ हजार रुपयांपैकी २२ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. २८ ऑक्टोबर रोजी लाचेच्या सापळ्याचा संशय आल्याने रोकडे यांनी मागणी केल्याप्रमाणे लाच रक्कम स्वीकारली नाही.
सदर लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, राजकिरण येवले, पोलिस हवालदार अश्मिता भगत, पोलिस शिपाई हेमराज गांजरे, पो. शि. होमेश्वर वाईलकर, प्रफुल भातुलकर, चालक पोशि. राजेंद्र जांभूळकर यांनी ही कारवाई केली.