आशा सेविकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:11+5:30
आशा सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य विभागात मोठी प्रगती झाली असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा मोठा लाभ मिळत आहे. त्यांचे कार्य लक्षात सर्व आशा सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा शासनाने द्यावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

आशा सेविकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ग्रामीण भागात आशा सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य विभागात मोठी प्रगती झाली असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा मोठा लाभ मिळत आहे. त्यांचे कार्य लक्षात सर्व आशा सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा शासनाने द्यावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित आशा दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल परिषद सभापती लता दोनोडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती देवराज वडगाये, पं.स. सभापती अर्चना राऊत, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, प्रतिभा परिहार, जया डोये, प्रमिला दसरिया, दिलीप वाघमारे, राजकुमारी विश्वकर्मा, भरत लिल्हारे उपस्थित होते.
आशा दिवस कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त आपल्या नाटकांमधून त्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संदेश दिला.
तसेच नृत्य, गीत गायन व रांगोळी स्पर्धेतूनही आरोग्य विषयक उपदेश देण्यात आला. स्पर्धेत सहभागी आशा सेविकांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन ए.एस. रहमतकर यांनी केले. आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांनी मानले.
कार्यक्रमासाठी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, डॉ. अमित खोडणकर, डॉ. रमेश गवळी तसेच एस.बी. वाहणे, एस.के. दोनोडे, ए.एस. रहमतकर, मनोज तिवारी, कमल गंगभोज, मिलिंद शेंडे यांनी सहकार्य केले.