अर्पितच्या मारेकऱ्यांना २४ तासांत अटक, रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
By नरेश रहिले | Updated: November 14, 2023 20:20 IST2023-11-14T20:19:28+5:302023-11-14T20:20:01+5:30
चाय शाय बार दुकाना समोर घडली होती घटना

अर्पितच्या मारेकऱ्यांना २४ तासांत अटक, रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
नरेश रहिले
गाेंदिया : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी अर्पित ऊर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३) रा. आंबाटोली, गोंदिया या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून ठार केल्याची घटना १२ नोव्हेंबरच्या रात्री ११:१५ वाजता दरम्यान घडली. या प्रकरणातील आरोपींना रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासात अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीत हर्ष छवींद्र वाघमारे, रा. कुडवा, अंकज सोहनलाल राणे उर्फ राणा, रा. डब्लींग कॉलनीजवळ गोंदिया व प्रवीण सुनील मुटकुरे रा. रेल्वे स्टेशन समोर, रेलटोली गोंदिया यांचा समावेश आहे. १२ नाेव्हेंबर रोजी राहुल राजू डाहाट (२४) रा. दीनदयाल वाॅर्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके (२४) रा. आंबाटोली गोंदिया हे पाल चौक ते गुरुद्वारा रस्त्याने जात असताना चाय शाय बार समोर रात्री ११:१५ वाजता मोटारसायकलने कट मारल्याच्या कारणावरून आरोपींसोबत वाद झाला.
या वादात हर्ष, अंकज व प्रवीण या तिघांनी अर्पित उके याच्यावर चाकूने वार करुन ठार केले. राहूल डहाट याला फरशीच्या तुकड्याने मारुन जखमी केले. खून करून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी रामनगर पोलिस रवाना झाले होते. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याच्या तपासा संदर्भात पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना मार्गदर्शन करून आरोपीचा तत्काळ शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. ठाणेदार संदेश केंजळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासात आरोपींना अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू बस्तावडे, पोलिस हवालदार राजेश भुरे, सुनीलसिंह चव्हाण, जावेद पठाण, छत्रपाल फुलबांधे, आशिष अग्निहोत्री, पोलिस नायक बाळकृष्ण राऊत, पोलिस शिपाई कपिल नागपुरे यांनी केली आहे.